जीव धोक्यात घालून ते दररोज करतात प्रवास! कसा तो वाचाच

डिलेश्‍वर पंधराम
Friday, 28 August 2020

एकीकडे या पुलाचे नवीन बांधकाम मंजूर करण्यात आले नाही. दुसरीकडे जुन्या जीर्ण पुलाची डागडुजी करून सुरक्षा कठडेही लावण्यात आले नाही. त्यामुळे अनेकदा या पुलाच्याखाली वाहने पडून अपघात झाले आहेत.
 

गोरेगाव (जि. गोंदिया) ः गोरेगाव-कालीमाटी रस्त्यावर असलेल्या म्हसगावजवळील पांगोली नदीवरचा पूल पूर्णतः जीर्ण झाला असून, या पुलावरून १० गावांतील नागरिकांना दररोज जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागतो आहे. या पुलाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.

म्हसगाव ग्रामपंचायत व घोटी हद्दीत येत असलेल्या पांगोली नदीवर ३५ वर्षांपूर्वी पाच फूट उंचीचा पूल तयार करण्यात आला. आता हा पूल जीर्ण झाला आहे. दर पावसाळ्यात या पुलावरून नदीचे पाणी वाहते. त्यामुळे तालुक्‍यातील १० गावांचा संपर्क तुटतो. अनेकदा या नदीवरच्या नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे, यासाठी नागरिकांनी बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांच्याकडे धाव घेऊन निवेदने दिली. परंतु, प्रयत्नांना यश आले नाही.

घोटी जिल्हा परिषद क्षेत्र, मुंडीपार जिल्हा परिषद क्षेत्रांतील गावे मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात येत असल्याने माजी मंत्री राजकुमार बडोले, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे नागरिकांनी धाव घेतली. मात्र, नवीन पूल बांधकामाची मागणी अजूनही धुळखात आहे.

एकीकडे या पुलाचे नवीन बांधकाम मंजूर करण्यात आले नाही. दुसरीकडे जुन्या जीर्ण पुलाची डागडुजी करून सुरक्षा कठडेही लावण्यात आले नाही. त्यामुळे अनेकदा या पुलाच्याखाली वाहने पडून अपघात झाले आहेत.

दरम्यान, या पुलावरून सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी नवीन पूल बांधकाम मंजूर करावे, या मागणीचे निवेदन तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोमेश रहांगडाले यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना दिले आहे.

अधिक माहितीसाठी - पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी नाराज! काय आहे नेमका बदल्यांचा ‘पेच’

पावसाळ्यात रस्ता बंद
पांगोली नदीवरील पूल जीर्ण झाला असून, अनेकदा जबाबदार अधिकारी, मंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे निवेदनस्वरूप तक्रार अर्ज दिले आहे. तरीही दुर्लक्ष झाले. पुलाचे बांधकाम मंजूर झाले नसल्याने पावसाळ्यात रस्ता बंद असतो.
यकराम बुरडे, माजी सरपंच, म्हसगाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dilapidated bridge in Gondia district