बेपत्ता होताच वाघांची नोंद गायब

श्रीकांत पनकंटीवार
Wednesday, 14 August 2019

भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा सपशेल फेल ठरल्या आहेत. बेपत्ता वाघांचे काय झाले, याचे उत्तरही वनविभागाकडे नाही. उलट, वनविभागाने बेपत्ता वाघांची नोंद गायब केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा सपशेल फेल ठरल्या आहेत. बेपत्ता वाघांचे काय झाले, याचे उत्तरही वनविभागाकडे नाही. उलट, वनविभागाने बेपत्ता वाघांची नोंद गायब केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
जिल्ह्यातील जंगल व जैवविविधतेमुळे वाघांच्या अधिवासासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे न्यू नागझिरा यासह कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील वाघांमुळे पर्यटनाला वाव मिळाला होता. येथील राष्ट्रपती, जय, जयचंद, अल्फा, डेडू या वाघांनी पर्यटकांना भुरळ घातली होती. मात्र, सहा वर्षांत येथील पर्यटकांना भुरळ घालणारे वाघ अचानक बेपत्ता झाले. 2013 मध्ये न्यू नागझिरा अभयारण्यातील राष्ट्रपती अचानक बेपत्ता झाला.  कोका अभयारण्यात पर्यटकांना अनेकदा दर्शन देणारी अल्फा नावाची वाघीण तिच्या बछड्यांसह बेपत्ता आहे. डेडू हा वाघ नागझिरा अभयारण्यातून बेपत्ता आहे. अल्फा आणि डेडू ही जोडी कोका अभयारण्यातील शान होती.
तर, आशिया खंडातील ऑयकान असलेला सर्वांत मोठा वाघ "जय" 18 एप्रिल 2016 पासून उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातून बेपत्ता आहे. वनविभागाने शोधमोहिम राबविली. मात्र, त्याचा शोध लागला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी "जय'चा शोध घेण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, तीन वर्षाचा कालावधी होऊनही अद्याप त्याचा कुठेच ठावठिकाणा लागलेला नाही. तर, काही दिवसानंतर "जय' चा शावक श्रीनिवास व जयचंद अचानक बेपत्ता झाला. 27 एप्रिल 2017 ला श्रीनिवासची विजेचा प्रवाह लावून शिकार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. मात्र, जयचंद चा शोध लागला नाही.  लाखो रुपयांचे रेडिओ कॉलर असलेले वाघच अभयारण्यातून बेपत्ता होत असल्याने वनविभागाच्या कारभारावर संशयाची सुई निर्माण झाल्याने अवी फांउडेशनचे डॉ. जेरील बानाईत यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सदर याचिकेवर न्यायालयाने राज्यशासनाने उत्तर मागविले.
सहा वर्षांच्या कालखंडात पाच वाघ बेपत्ता झाले. तर, काही वाघांची शिकार व नैसर्गिक मृत्यू झाल्याने याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. उमरेड-पवनी-कऱ्हांडला व कोका अभयारण्यातील वाघांच्या भरवशावर पर्यटनवृद्धी, रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाघांच्या मृत्यूचे गूढ कायम
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याच्या पवनी वनक्षेत्रात राही व राजा या दोन वाघांचा मृत्यू झाला. या वाघांचा मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हेसुद्धा वनविभागाने स्पष्ट केले नाही. राही, राजा या वाघांवर विषप्रयोग करून शिकार केल्याची चर्चा होती. मात्र, वनविभागाने नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगून प्रकरण पूर्णविराम देण्याचा प्रकार केला आहे. अभयारण्यातील वाघ बेपत्ता होत आहेत.

रेडिओ कॉलर लावण्यात आलेले वाघ अचानक बेपत्ता होणे, हे गंभीर बाब आहे. वाघांमुळे शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. केवळ वाघांची संख्या वाढत असल्याचे सांगत असले तरी, बेपत्ता वाघांचा काय झाले, याची माहिती वनविभागाकडे नाही. ही एक शोकांतिका आहे.
- डॉ. जेरील बानाईत

अवी फाउंडेशन, नागपूर.

-------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disappeared Tiger records disappear