आजारी वृद्धेस रस्त्यात टाकून आप्तांचे पलायन; प्रकृती गंभीर होऊ लागल्याने सोडले वाऱ्यावर

कृष्णा लोखंडे
Thursday, 8 April 2021

बबलू शेखावत यांना आरोग्ययंत्रणेचा आलेला पूर्वानुभव लक्षात घेत त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून व्यवस्था करण्याची सूचना केली. येथे मात्र प्रतिसाद मिळाला. तातडीने व्यवस्था झाली. या महिलेवर उपचार सुरू झाले आहेत.

अमरावती : परप्रांतातून आलेल्या आजारी महिलेस रस्त्यावर सोडून आप्ताने पळ काढल्याने असहाय झालेल्या महिलेस मनपाचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी मदतीचा हात देत माणुसकीचा परिचय दिला. आता या आजारी वृद्धेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तिला नंतर मनपाच्या बडनेरा येथील आधार केंद्रात हलविण्यात येणार आहे.

गुजरातमधून ही वृद्ध महिला आप्ताबरोबर अमरावतीत आली. ती आजारी असल्याने व प्रकृती गंभीर होऊ लागल्याने आप्ताने तिला रस्त्यात सोडून पळ काढला. रस्त्याच्या कडेला ती विव्हळत पडून असताना उर्मी शाह यांना दिसली. त्यांनी बबलू शेखावत यांना यासंदर्भात कळवून काही व्यवस्था करता येऊ शकेल का? अशी विचारणा केली.

शेखावत यांनी तत्काळ सर्व संबंधित आरोग्य यंत्रणांसोबत संपर्क साधला. मात्र, त्यांना चांगला अनुभव आला नाही. अखेर मनपाच्या बडनेरा येथील आधार केंद्राचाच आधार घ्यावा, अशा विचाराने त्यांनी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधला. नरेंद्र वानखडे यांनी आधार केंद्राची चमू तातडीने तिथे पाठविली. मात्र, वृद्ध महिलेस आधी उपचाराची गरज असल्याने तिला रुग्णालयात नेण्याचे ठरले.

अधिक माहितीसाठी - हिट एक्झॉशन, हिट स्ट्रोक स्वतःला कसे वाचवाल? जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे आणि उपचार

बबलू शेखावत यांना आरोग्ययंत्रणेचा आलेला पूर्वानुभव लक्षात घेत त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून व्यवस्था करण्याची सूचना केली. येथे मात्र प्रतिसाद मिळाला. तातडीने व्यवस्था झाली. या महिलेवर उपचार सुरू झाले आहेत. यानंतर तिला बडनेरा येथील महापालिकेच्या आधारकेंद्रात हलविण्यात येणार आहे. या केंद्राचे व्यवस्थापक राजू बसवनाथे, ज्योती राठोड व कर्मचाऱ्यांनी या कामात महत्त्वाची कामगिरी बजावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disaster escapes by throwing sick old man on the road amravati news