esakal | अमरावती विभागातील 21 धरणांतून विसर्ग सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Dam Water

अमरावती विभागातील 21 धरणांतून विसर्ग सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सप्टेंबरमधील पावसाने अमरावती विभागातील सर्व धरणांमधील पाणीपातळी चांगलीच वाढली. अजूनही मोठ्या व मध्यम, अशा 21 धरणांतून कमी-अधिक विसर्ग सुरू आहे. झालेला पाणीसाठा बघता आगामी रब्बी हंगामात सिंचनाची सोय व उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्याचा ताण हलका होण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागात 9 मोठे, 24 मध्यम व 477 लघू सिंचन प्रकल्प आहेत. एकूण 511 सिंचन प्रकल्पात सध्या 3383 दलघमीच्या तुलनेत 2753 दलघमी (83 टक्के) जलसाठा झाला आहे. नऊ मोठ्या धरणांपैकी अमरावतीमधील अप्पर वर्धा, यवतमाळमधील पूस, बेंबळा, अकोल्यातील काटेपूर्णा व यवतमाळमधील खडकपूर्णा यातून विसर्ग सुरू आहे. 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांतून विसर्ग करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. अरुणावती प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले असून उद्या-परवापर्यंत उर्वरित धरणांचेही दरवाजे बंद करण्यात येतील, असे जलसंपदा अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: दोन मुलांचे भांडण सोडविणे जीवावर बेतले, पित्याचा मृत्यू

मध्यम श्रेणीतील अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सपन, यवतमाळमधील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, अकोल्यातील निर्गुणा, घुंगशी बॅरेज, वाशीम जिल्ह्यातील अडाण, सोनल, एकबुर्जी, तर बुलडाण्यातील कोराडी व उतावळी यांचे दरवाजे लवकरच बंद करण्यात येणार आहेत. सध्या या सर्व धरणांतून विसर्ग सुरू आहे.

विभागातील 477 लघूप्रकल्पांत 1150 दलघमीच्या तुलनेत 75 टक्के म्हणजे 863 दलघमी जलसाठा झाला आहे. बहुतांशी लघूप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. यंदा जलसाठा पुरेसा झाला असल्याने आगामी रबी हंगामात सिंचनासाठी पाच पाळ्या सोडता येणार आहेत, तर उन्हाळ्यात जाणवणारे पाणीपुरवठ्याचे दुर्भिक्ष काही प्रमाणात कमी होणार आहे.

loading image
go to top