"गड्या आपल्या गावचा मुख्य कारभारी कोण?" गावखेड्यांत रंगू लागल्या चर्चा; दिग्गजांना फटका बसण्याची शक्‍यता

मुनेश्‍वर कुकडे 
Tuesday, 19 January 2021

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 544 ग्रामपंचायतींपैकी मुदत संपलेल्या 189 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी 8 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. 311 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 181 ग्रामपंचायतींच्या 1382 जागांसाठी शुक्रवारी (ता.15) मतदान झाले. 

गोंदिया ः ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. ग्रामपंचायत सदस्यत्वाचा शिक्का लागला. असे असले तरी, आता खऱ्या अर्थाने सरपंचपदाच्या आरक्षणाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. कोण होईल गावचा सरपंच, याच चर्चा गावखेड्यांतील चौकाचौकांत, पानटपऱ्यांत केल्या जात आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 544 ग्रामपंचायतींपैकी मुदत संपलेल्या 189 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी 8 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. 311 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे 181 ग्रामपंचायतींच्या 1382 जागांसाठी शुक्रवारी (ता.15) मतदान झाले. 

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

मतदारांनी निवडणूक रिंगणात असलेल्या 3 हजार 151 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशिनबंद केले. जिल्ह्यात एकूण 79.83 टक्के मतदान झाले. मतदान आटोपल्यावर तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (ता.18) तालुकास्थळावर मतमोजणीला सुरुवात झाली. ग्रामपंचायत निवडणूक ही कोण्या पक्षाच्या बॅनरवर लढली जात नसली तरी, पक्ष समर्थित पॅनेलवर निवडणूक लढली गेली. निवडून आलेले उमेदवार आपल्याच पक्षाच्या समर्थित पॅनेलचे असल्याचे दावे-प्रतिदावे राजकीय पक्षांकडून केले गेले. त्यामुळे विजयी उमेदवार नेमका कोणत्या पक्षाच्या समर्थित पॅनेलचा, हेच कळेनासे झाले होते. 

महत्त्वाचे म्हणजे, विजयी उमेदवारांतही गोंधळ उडाल्याचे बोलले जात होते. अखेर जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतींच्या 1383 जागांवर उमेदवार निवडून आले असून, त्यांना ग्रामपंचायत सदस्यत्वाचा शिक्का लागला आहे. असे असले तरी, राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले नसल्याने अनेकांच्या नजरा आरक्षणाकडे खिळल्या आहेत. दोन दिवसानंतर आरक्षण जाहीर होईलही. मात्र, सदस्यत्वाच्या निवडणुकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी गावचा मुख्य कारभारी कोण? याच चर्चा गावखेड्यांतील चौकाचौकांत, पानटपऱ्यांत चर्चेला येत होत्या. सरपंचपदाचे आरक्षण घोषित झाले, तर दिग्गजांना फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

जाणून घ्या - आधी कापली हाताची नस, रुणालयात जाताना अचानक घेतली उडी अन् घडला थरकाप उडवणारा प्रसंग

ग्रामपंचायत सदस्य गेले पर्यटनाला

रावणवाडी ः येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी नव्या चेहऱ्याला गावविकासाची संधी दिली आहे. भाजप समर्थित परिवर्तन पॅनेलचे 8 उमेदवार निवडून आले आहेत. 22 जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर परिवर्तन पॅनेलचेच सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीत विराजमान होतील, हे तितकेच खरे आहे. परंतु, तालुक्‍यातील अधिकाधिक नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडीसाठी धार्मिकस्थळी पर्यटनाला रवाना झाल्याचे बोलले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या पॅनेलला बहुमत मिळाले नाही, ते पॅनेल अन्य पॅनेलच्या निवडून आलेल्या सदस्यांना लालच देऊन आपल्या पॅनेलकडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे लक्ष लागून आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussions over Gram Panchayat elections results in villages Gondia