जिल्हाधिकाऱ्यांची बदली : `विरोधक' मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचूनही वडेट्टीवारांनी मिळवला ‘विजय’

अतुल मेहेरे
Saturday, 15 August 2020

गुल्हानेंच्या स्वागताचा पुष्पगुच्छ एकट्या वडेट्टीवारांनीच आणला. त्या गुच्छातील एखादे फुल किंवा काही पाकळ्याही कुणावर पडल्या नाहीत. गुल्हानेंच्या स्वागतामध्ये पालकमंत्र्यांनी कुणालाही सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे ते दुखावले असल्याचे सांगण्यात येते. 

नागपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या दक्षतेमुळे सुरुवातीच्या काही महिन्यांत कोरोना जिल्ह्यात भटकलाही नाही. ते स्वतः डॉक्टर असल्याचा जिल्ह्याला फायदा झाला. त्यांच्या मागे मोठे जनमत होते. सोशल मीडियावरून जनतेने त्यांची पाठराखनही केली. परंतु, पालकमंत्र्यांनी त्यांची बदली करूनच दम घेतला. बदली करण्याला कुणाचाही विरोध नव्हता. कारण, प्रशासकीय कार्यवाहीचा तो एक भाग आहे. आता मात्र विविध चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हाधिकरी डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीचा खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार नरेश पुगलीया, आमदार किशोर जोरगेवार या सर्वांनी विरोध केला होता. या सर्वांनी डॉ. खेमनार यांची बदली करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवले होते. पण पक्षातील आणि पक्षाबाहेरील पदाधिकाऱ्यांनी येवढा टोकाचा विरोध करूनही पालकमंत्री विजय वडेट्टीवारांनी या बदली प्रकरणात ‘विजय’मिळवला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांवर ते वरचढ ठरल्याचेही बोलले जात आहे. 

अधिक वाचा -  ते मुहूर्त काढत जातील; पण सरकार इंचभरही हलणार नाही, कोणी व्यक्त केला हा विश्वास...

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांची तडकाफडकी बदली करून अजय गुल्हाने यांना चंद्रपुरात ताबडतोब आणण्यात आले. किंबहुना गुल्हाने यांची स्वतःची ती इच्छा होती. अजय गुल्हाने यांच्या स्वागताचा पुष्पगुच्छ एकट्या वडेट्टीवारांनी १२ तासांत मुंबईहून चंद्रपुरात आणला. पालकमंत्री विजय वडेट्टीवारांच्या पक्षांतर्गत आणि आणि पक्षाबाहेरील विरोधकांचे दुखणे नेमके येथेच आहे. गुल्हानेंच्या स्वागताचा पुष्पगुच्छ एकट्या वडेट्टीवारांनीच आणला. त्या गुच्छातील एखादे फुल किंवा काही पाकळ्याही कुणावर पडल्या नाहीत. गुल्हानेंच्या स्वागतामध्ये पालकमंत्र्यांनी कुणालाही सहभागी करून घेतले नाही. त्यामुळे ते दुखावले असल्याचे सांगण्यात येते. 

पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनी विरोध

कोरोनाच्या स्थितीत जिल्ह्याचे काम व्यवस्थित सुरू होते. त्यामुळे सध्याच त्यांना येथून हलवायला नको, अशी एक जनभावना होती. त्यामुळेच बदलीच्या विषयात पालकमंत्र्यांना त्यांच्या पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनी विरोध केला. पण हा विरोध डॉ. कुणाल खेमनार यांच्याबद्दल चांगली भावना आहे म्हणून नव्हे, तर त्यामागे झालेल्या ‘घडामोडीं’मुळे असल्याची चर्चा आता चंद्रपूर जिल्ह्यात रंगली आहे. 

जाणून घ्या - सतरा महिन्यांत सरपंच झाला नायक!

पालकमंत्री खासदारात शितयुद्ध?

पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर एकदम आमने-सामने जरी आले नसले तरी. कुठेतरी शीतयुद्ध सुरू असल्याचाही समज जनतेचा झाला आहे. बाळू धानोरकर खासदार व्हावे, यासाठी तेव्हा वडेट्टीवारांनी मोठा जोर लावला होता. त्यांच्या परिश्रमाने धानोरकर खासदार झालेही. त्यानंतर त्यांनी आपली ‘प्रतिभा’सिद्ध केली. पण वडेट्टीवारांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांचे कामकाज सुरू नव्हते. त्यामुळे वडेट्टीवार त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे आणि सद्यस्थितीत त्यांच्यामध्ये खटके उडत असल्याचेही सांगितले जाते. पण काहीही असो, जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीत मात्र वडेट्टीवारांनीच बाजी मारली आणि पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना लोळवले, येवढे मात्र खरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute over transfer of Collector Kunal Khemnar