... नाही तर आम्ही निघून जाऊ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

परमध्ये उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाचे नाव रोशनी शास्त्रकार (40) असे आहे. त्या विश्‍वकर्मानगर येथील रहिवासी. दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. दोन वर्षांपासून सुपरमध्येच उपचार सुरू आहे. डायलेसिसवर आयुष्य आहे. डायलिसिससोबतच इतरही प्रक्रिया कराव्या लागत असल्याने वारंवार सुपरमध्ये आणले जाते.

नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा किडनी रोग विभागाचा वॉर्ड... सकाळची वेळ... वेदनेने विव्हळत असलेल्या महिला रुग्णाला थेट वॉर्डात उपचारासाठी आणले. दाखल करून घ्या, अशी विनवणी नातेवाइकांनी डॉक्‍टरांना केली. मात्र, डॉक्‍टर थेट वॉर्डात रुग्णाला का आणले, असा सवाल करीत भरती करून घेण्यास तयार नव्हते. यामुळे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे बराचवेळ सुपरच्या बाह्यरुग्ण विभागात तणावाचे वातावरण होते.

हे वाचाच - तो पच्चावन्न वर्षांचा आणि ती नऊ वर्षांची अन्‌...

सुपरमध्ये उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाचे नाव रोशनी शास्त्रकार (40) असे आहे. त्या विश्‍वकर्मानगर येथील रहिवासी. दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. दोन वर्षांपासून सुपरमध्येच उपचार सुरू आहे. डायलेसिसवर आयुष्य आहे. डायलिसिससोबतच इतरही प्रक्रिया कराव्या लागत असल्याने वारंवार सुपरमध्ये आणले जाते. मात्र, गुरुवारी पहाटे प्रकृती अधिकच खालावली. उपचारासाठी सुपरच्या वॉर्डात थेट नेण्यात आले. तिसऱ्या माळ्यावर किडनी विभागात आणले होते. येथे एका रिकाम्या खाटेवर ठेवले. पुढे डॉक्‍टरांना माहिती दिली गेली. त्यावर डॉक्‍टरांनी रुग्णाला थेट वॉर्डातील खाटेवर का आणले, यावरून डॉक्‍टर आणि नातेवाईक यांच्यात वादाला तोंड फुटले. डॉक्‍टरांनी रुग्णाला दाखल करण्यास नकार देताच नातेवाईक संतप्त झाले.

रुग्णाला काही दिवसांपूर्वी डॉक्‍टरांनी रक्त लावले होते. त्यानंतर रुग्णाची प्रकृती हळूहळू खालवली. गुरुवारी प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे तिला लावलेल्या रक्ताबाबत नातेवाइकांनी शंका व्यक्त केली. प्रशासनाकडे तशी रितसर तक्रार देण्यात येईल, असेही रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले. डॉक्‍टरांनी रुग्णाला उपचार करण्यास नकार दिला. हे योग्य नसून वरिष्ठांनी संबंधित डॉक्‍टरवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक अरुण शास्त्रकार यांनी केली आहे.

रुग्णाला ठेवून आम्ही निघून जातो

वाद पेटला असताना एका नातेवाईकाने आम्ही रुग्णाला खाटेवरच सोडून निघून जातो, असे सूचक विधान केले. यामुळे डॉक्‍टरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. एका वरिष्ठ डॉक्‍टरांनी येथे धाव घेतली. नातेवाईक आणि डॉक्‍टर या दोन्ही गटांना शांत करीत रुग्णाला दाखल करून घेण्याचा सल्ला दिला व उपचार सुरू झाले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली.

"डॉक्‍टरांचा दोष नाही'

मागील दोन वर्षांपासून या रुग्णावर सुपरमध्ये डॉक्‍टरांकडून उपचार सुरू आहेत. गुरुवारी किडनी विभागाशी संबंधित बाह्यरुग्ण विभागाचा दिवस होता. रुग्णाला दाखल करीत, उपचार सुरू झाले. मात्र, एका नातेवाइकाने विनाकारण वॉर्डात डॉक्‍टरांशी वाद घातला. यामुळे शाब्दिक चकमक झाली. उपचारात अडथळा निर्माण होत असल्यानेच डॉक्‍टरांनी विरोध केला. या घटनेत डॉक्‍टरांचा कोणताही दोष नसून शेवटी समजूत काढल्यानंतर विषय संपला, असे सुपरच्या किडनी रोग विभागप्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disputes between patients and doctors at the Super Specialty Hospital