जिल्हा बॅंक निवडणूक; उमेदवारी अर्जासाठी इच्छुकांच्या उड्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

तालुका गटात 595, तर जिल्हा गटातील 1,025 एवढी मतदारांची संख्या आहे. जिल्हा व तालुका गटातील मतदार 21 संचालकांची निवड करणार आहेत. विधानसभा व विधान परिषदेनंतर पुन्हा राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. नामांकन उचल व दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी आज मंगळवारी (ता.25) इच्छुकांच्या उड्याच पडल्या. दरम्यान, आज दोन इच्छुकांनी तीन नामांकन दाखल केले.

हे वाचा—डाॅनच्या बंगल्यावर मनपाचा हातोडा

निवडणूक तब्बल 12 वर्षांनंतर

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक तब्बल 12 वर्षांनंतर होऊ घातली आहे. संचालक म्हणून बॅंकेत जाण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना आदी पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर आज मंगळवारपासून उमेदवारी अर्जांची विक्री आणि नामांकन स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी तीनशे नामांकनांची इच्छुकांनी उचल केली. राजेश अग्रवाल यांनी दोन, तर छाया मॅडमवार यांनी एक नामांकन दाखल केला. नामांकन अर्जाची किमत शंभर रुपये आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवाराला पाचशे रुपये, तर इतर प्रवर्गातील उमेदवाराला दोन हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. 

हे वाचा—प्रणिती शिंदे म्हणाल्या, तुमच्यासाठी अधिवेशन चुकवले ; बरोबर केल, की चूक...

21 संचालकांची निवड

तालुका गटात 595, तर जिल्हा गटातील 1,025 एवढी मतदारांची संख्या आहे. जिल्हा व तालुका गटातील मतदार 21 संचालकांची निवड करणार आहेत. विधानसभा व विधान परिषदेनंतर पुन्हा राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नामांकन विक्री व दाखल प्रक्रियेला सुरुवात होताच राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आलेला दिसून येत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी ही निवडणूक होण्याची चिन्हे दिसत असली तरी अंतर्गत घडामोडींवरदेखील बरेच काही अवलंबून आहे. आज मंगळवारपासून नामांकन दाखल करण्याची सुरू झालेली प्रक्रिया येत्या शनिवार 29 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने नेत्यांना बंडोबांना शांत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

थकबाकीदार अपात्र

थकबाकीदार असलेल्या व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणात उभे राहता येणार नाही. नियमित कर्जदार असलेला व्यक्ती उभा राहू शकतो. त्यामुळे बॅंक, पतसंस्थेचा थकबाकीदारांचा यामुळे हिरमोड झाला आहे. इच्छुकांमध्ये थकबाकीदारांची संख्या बरीच मोठी असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून देण्यात आली.

डीडीआर कार्यालयात जत्रा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर नामांकन दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी डीडीआर कार्यालयात राजकीय पुढाऱ्यांची चांगलीच जत्रा बघावयास मिळाली. निवडणुकीचे चित्र काय राहील, अशा चर्चांचा फड येथे रंगला होता. तब्बल 12 वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

मध्यवर्ती बॅंक निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर आजपासून नामांकन विक्री व दाखल प्रक्रियेला सुरुवात झाली. आचारसंहिता जाहीर होताच बॅंक अध्यक्षांचे वाहन जमा करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. यात उल्लंघन होऊ नये, याबाबत पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
- रमेश कटके,जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Bank Elections; Candidates' flying for candidacy application