esakal | बिरसा मुंडांच्या पुतळ्याचे प्रकरण माहितीच नाही; चंद्रपूरच्या महापौरांचा दावा; पोलिसांवर खापर 

बोलून बातमी शोधा

Do not know about matter of Birsa Munda said chandrapur Mayor }

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे स्थानकासमोर क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा आदिवासी संघटनातर्फे लावण्यात आला. या पुतळा रस्त्यावरील अतिक्रमण आहे,

बिरसा मुंडांच्या पुतळ्याचे प्रकरण माहितीच नाही; चंद्रपूरच्या महापौरांचा दावा; पोलिसांवर खापर 
sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंद्रपूर ः गोंडकालीन वारसा असलेल्या चंद्रपूर शहरात महानगरपालिकेने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविला. याचे तीव्र पडसाद आदिवासी संघटनांमध्ये उमटत आहे. प्रकरण अंगलट येणार असे दिसताच आता महापौर राखी कंचर्लावार यांनी सावरासावर सुरू केली आहे. पुतळा हटविण्याचे खापर त्यांनी 'प्रशासन' आणि पोलिसांवर फोडले. या कारवाईची माहिती शहराची प्रथम नागरिक असताना आपल्याला दिली नाही, असा दावाही त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे स्थानकासमोर क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा आदिवासी संघटनातर्फे लावण्यात आला. या पुतळा रस्त्यावरील अतिक्रमण आहे, या कारणावरून महानगरपालिकेने 27 फेब्रुवारीला पोलिस बंदोबस्त आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटविला. त्यामुळे आदिवासी समाजात रोष निर्माण झाला आहे. आता याची झळ पक्षाला बसू नये यासाठी महापौरांनी सावरासावर सुरू केल्याचे बोलले जात आहे. 

दुर्दैवी! पोटच्या मुलाच्या मांडीवरच आईनं सोडला प्राण; काटोल नाक्याजवळ झाला भीषण अपघात 

महापौरांनी मनपातील पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी समितीचे सभापती रवि आसवानी उपस्थितीत होते. मनपाच्या आमसभेत बिरसा मुंडा यांचे नाव रेल्वे स्थानकासमोरील चौकाला देण्याचा निर्णय घेतला. या जागेवर आदिवासीबांधवांनी स्वखर्चाने पुतळा उभारला होता. मात्र, मनपा पदाधिकाऱ्यांना सूचना न देता 'प्रशासन' आणि पोलिसांनी पुतळा हटविला. त्यामुळे आदिवासींना दिलासा द्यावा, अशी विनंती महापौरांनी निवेदनातून केली. 

पुतळा हटविण्याची कारवाई मनपाने केली असतानाही महापौर याची जबाबदारी प्रशासन आणि पोलिसांवर ढकलत असल्याचे त्यांच्या निवेदनातून स्पष्ट होत आहे. उल्लेखनीय असे की, शहरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई मनपा प्रशासन करते. परंतु महापौरांनी एकदाही आपल्या निवेदनात 'मनपा प्रशासन' असा उल्लेख केलेला नाही. त्यांनी केवळ 'प्रशासन' हा शब्द वापरला आहे. आयुक्त राजेश मोहीते यांनीही प्रशासन, मनपा आणि पोलिसांनी मिळून संयुक्त कारवाई केली असे 'सकाळ'शी बोलताना सांगितले. मात्र तहसीलदार नीलेश गौंड यांनी महापौर आणि आयुक्तांचा दावा खोडून काढला. 

महसूल विभागाला अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कळविले. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राहावी, यासाठा दंडाधिकारी पाठविला. ही नेहमीची पद्धत आहे. कारवाई मनपाचीच आहे. पोलिस अधिकाऱ्यांनीसुद्धी हीच री ओढली. आमची जबाबदारी मनपाच्या कारवाईला सुरक्षा पुरविण्याची असते. पुतळा हटविण्याचे अधिकार आमचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आणि महापौरांच्या दाव्यातील हवा काढली.

वैधानिक मंडळावर वैदर्भीय नेत्यांची एकजूट; राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

आदिवासी समाजात रोष

बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविण्याच्या मनपाच्या कारवाईने आदिवासी समाजात रोष निर्माण झाला आहे. आदिवासींच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविण्याचे काम मनपाने केले आहे. महापौरांनीही कारवाईबाबत कानावर हात ठेवले. आदिवासी समाजाने मनपाला सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. सात दिवसांच्या आत पुतळा पूर्ववत त्याच ठिकाणी लागायला हवा अन्यथा आठव्या दिवशी आम्ही बसवू असा इशारा क्रांतिवीर नारायणसिंह उईके आदिवासी विकास संस्थेने पत्रकार परिषदेत दिला. यावेळी अशोक तुमराम, युवराज मेश्राम, राजेंद्र धुर्वे, विनोद तोडराम, शुभम मडावी, जीनेश कुळमेथे, जमुना तुमराम, वैशाली मेश्राम, माधुरी पेंदाम, दिवाकर मेश्राम,डॉ. प्रवीण येरमे, किशोर पेंदे. विजय कुमरे, प्रमोद बोरीकर, क्रिष्णा मसराम आदींची उपस्थिती होती. 

संपादन - अथर्व महांकाळ