डॉ. प्रकाश आमटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी 

Doctor Prakash Amte seeks for wine banned in Gadchiroli to udhhav Thackeray
Doctor Prakash Amte seeks for wine banned in Gadchiroli to udhhav Thackeray

गडचिरोली : चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचालींना वेग येत असताना दारूबंदीच्या बचावासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे पुढे सरसावले असून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी म्हटले आहे की, जनतेच्या हितासाठी दारूबंदी असणे गरजेचे आहे. दारूबंदीला माझे समर्थन असून राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी. गडचिरोली जिल्ह्यात 1993 मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. 

शासकीय दारूबंदीनंतर गावा-गावांतील संघटनांनी पुढाकार घेऊन गावात दारूबंदी लागू केली. जिल्ह्यात दारूबंदीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही स्थितीत गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठवू नये, उलट दारूमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी अधिक प्रबळ कृती करावी. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी 2015 मध्ये झाल्यामुळे सीमेवरून गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू येणे थांबले आहे. म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी अजिबात उठवू नये. उलट तिथे देखील गडचिरोलीसारखे दारूमुक्तीचे यशस्वी अभियान शासनाद्वारे सुरू करण्यात यावे, अशी मागणी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

समाजसेवक विरुद्ध राजकारणी 

दारूबंदीच्या मुद्यावरून सध्या समाजसेवक विरुद्ध राजकारणी असा सामना रंगत असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासंदर्भात राज्याचे मंत्री तथा कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी समितीची स्थापना केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार धर्मरावबाबा आत्राम मैदानात उतरले. त्याच दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे पुत्र डॉ. आनंद बंग यांनी आत्राम यांच्यावर शेलक्‍या शब्दात टीका केली. 

यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरही टीका केली. त्यानंतर माजी आमदार तथा समाजसेवक हिरामण वरखडे यांनी दारूबंदीचे समर्थन केले, तर आता डॉ. प्रकाश आमटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे समाजसेवक विरुद्ध राजकारणी असा हा सामना रंगत असल्याचे दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com