माणुसकीला कळीमा! बाळाचा जन्म अन् पतीचा मृत्यू; बाळ अपशकुनी असल्याचे समजून केले भयानक कृत्य

टीम ई सकाळ
Sunday, 24 January 2021

मानवी शरीर कोणतीही अनावश्‍यक बाह्यवस्तू (फॉरेन बॉडी) स्वीकारत नाही. अशा धातूच्या वा अन्य वस्तू शरीराच्या आत दीर्घकाळ राहिल्यास त्यापासून संसर्ग तर होतोच, शिवाय गंभीर आणि जीवघेण्या आजारासही ते कारणीभूत ठरू शकते.

वर्धा : तर्कशून्य विचार कधी कौटुंबिक जाचाला कारणीभूत ठरतील, याची शाश्वती आरोग्याच्या क्षेत्रातही देता येत नाही. अशाच कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरलेल्या स्त्री रुग्णाच्या पोटातून तब्बल दहा महिन्यांनंतर शस्त्रक्रियेद्वारे इंजेक्‍शनच्या सुया काढून दिलासा देणारा उपचार सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला.

सावंगी (मेघे) रुग्णालयात तिला भरती करून ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. मीनाक्षी येवला पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या आणि उपचार सुरू झाले. अद्यावत उपकरणांमुळे पोटातील सुयांची स्थिती दिसत असली तरी त्यातील एका सुईवर मास चढलेले असल्यामुळे शस्त्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. अखेर सर्व अद्यावत साधने वापरून तब्बल चार तास शस्त्रक्रिया करीत या तिन्ही सुया काढण्यात आल्या.

अधिक वाचा - बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा! हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय

मानवी शरीर कोणतीही अनावश्‍यक बाह्यवस्तू (फॉरेन बॉडी) स्वीकारत नाही. अशा धातूच्या वा अन्य वस्तू शरीराच्या आत दीर्घकाळ राहिल्यास त्यापासून संसर्ग तर होतोच, शिवाय गंभीर आणि जीवघेण्या आजारासही ते कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अशा घटनांमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. मीनाक्षी येवला यांनी व्यक्त केली.

कौटुंबिक हिंसाचाराचे विदारक सत्य

नागपूर येथील ३२ वर्षीय लक्ष्मी (बदललेले नाव) या रुग्णाला पोटात वेदना होत असल्यामुळे सावंगी (मेघे) रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी रुग्णाचे सीटी स्कॅन केले असता पोटात वेगवेगळ्या ठिकाणी धातूच्या तीन सुया दिसून आल्या. या सुया पोटात कशा गेल्या याची माहिती घेतली असता कौटुंबिक हिंसाचाराचे एक विदारक सत्य समोर आले.

जाणून घ्या - विदर्भाचे मोठे नुकसान; तायवानने १० हजार कोटींचा प्रकल्प गुंडाळला, येणारा रोजगारही गेला

मानसिक आणि शारीरिक आजार

दहा महिन्यांपूर्वी लक्ष्मीने बाळाला जन्म दिला. मात्र, अपत्य जन्माच्याच दिवशी पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. हे नवजात बाळ अपशकुनी आहे. त्याच्याचमुळे मुलाचा मृत्यू झाला, अशी हेटाळणी सासरी सुरू झाली. अखेर या जाचाला कंटाळून लक्ष्मीने घर सोडले आणि माहेरी परतली. या काळात तिला मानसिक आणि शारीरिक आजारालाही सामोरे जावे लागले.

दहा महिन्यांनंतर त्रास सुरू

माहेरी असतानाच तिच्या पोटात दुखणे सुरू झाले. पोटातील संसर्ग वाढल्याने तिने जेवणही सोडून दिले. तिच्या वेदना असह्य झाल्यामुळे परिवारातील सदस्यांनी सावंगी रुग्णालयात भरती केले. यावेळी अद्ययावत उपकरणांद्वारे रुग्णाची तपासणी केली असता पोटात बळजबरीने इंजेक्‍शनच्या नीडल्स सोडल्याचे सत्य पुढे आले. परिचारिका राहिलेल्या घरातील एका व्यक्तीने या सुया घुसविल्याचे समोर आले. उदरपोकळीत शिरलेल्या या सुयांचा सुमारे दहा महिन्यांनंतर त्रास सुरू झाल्याने ही घटना समोर आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor removed the needles from the womans abdomen