कोरोना विरुद्धच्या लढाईत रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत डॉक्‍टर योद्धे, जनतेचीही सलामी

doctor.
doctor.

यवतमाळ : कोरोना संकटकाळात माणसापासून माणूस दूर गेला. जीव वाचविण्याच्या आकांताने नातेही दुरावले गेले. याच काळात डॉक्‍टरांनी स्वत:च्या जीवापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत सैनिक म्हणून लढ्याला साथ दिली. गेल्या मार्च महिन्यापासून सुरू झालेली ही लढाई अद्यापही सुरूच आहे. कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी सुखरूप पोहोचत आहेत. प्रथमच रुग्ण व डॉक्‍टर यांच्यातील नातेही दृढ झाले आहेत. योद्‌ध्यांना जनतेतून सलाम केला जात आहे. बुधवारी (ता.एक) डॉक्‍टरदिनाच्या निमित्ताने डॉक्‍टरांनी व्यक्त केलेले मत.

सैनिक प्रत्यक्ष युद्घभूमीवर शत्रूंशी लढा देत मायभूमीचे रक्षण करतात. तसेच डॉक्‍टरदेखील कोरोनारूप शत्रूला पराभूत करण्यासाठी अहोरात्र संघर्ष करीत आहेत. मधल्या काळात डॉक्‍टरांवर विविध प्रकारचे आरोपही करण्यात येत होते. डॉक्‍टर व्यावसायिक झालेत. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव नाही. मात्र, कोरोना काळात एक-एक जीव वाचविण्यासाठी सर्वांत पुढे आले ते डॉक्‍टरच. प्रसंगी त्यांनी आपल्या घरादाराची, कुटुंबाची, मुलांची पर्वा केली नाही. कोरोना नावाचे भय कशाला म्हणतात, हे डॉक्‍टरांनाच माहीत. रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात डॉक्‍टरही कोरोनाबाधित झाले आहेत. आपण आठ तास सेवा दिली पाहिजे. हा भावही या काळात गळून पडला. कोरोना नाव उच्चारताच रक्ताचे नातेही दुरावले गेले. याच संकटात डॉक्‍टरांनी रुग्णांना कवटाळले. जे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना डॉक्‍टरांत भला माणूस दिसला. घरात सुरक्षित असलेल्या जनतेनेही डॉक्‍टरांना योद्‌ध्याची उपाधी बहाल करीत सलामच केला आहे.

डॉक्‍टर रुग्णसेवेत प्रामाणिकच
प्रशासनाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना मिळाल्यापासून आम्ही कर्तव्यावर आहोत. यवतमाळ येथे पहिला बाधित रुग्ण आढळल्यावर खळबळ निर्माण झाली. पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन बरा झाला पाहिजे. या भावनेतूनच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपचार केलेत. डॉक्‍टर रुग्णसेवेत कालही प्रामाणिक होते आणि आजही आहेत. आम्ही कधीच स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही.
डॉ. मिलिंद कांबळे
कोरोना समन्वयक, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

धोका पत्करून रुग्णसेवा
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना डॉक्‍टरांच्या मनाची होणारी घालमेल त्यांनाच माहीत आहे. मात्र, धोका पत्करून आम्ही रुग्णसेवेला प्राधान्य दिले आहे. खरी काळजी स्वत:ची कधीच वाटली नाही. संपर्कात येणारे कुटुंबातील सदस्य व मित्रांना आपल्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये, असे मनोमन वाटत राहते. सुरुवातीच्या काळात रुग्णालयातून घरी आल्यावर जवळपास दोन महिने स्वत:ला पूर्णपणे वेगळे ठेवले. आता रूटीन सवय झाली आहे. नागरिकांनी स्वत: काळजी घेतल्यास कोरोनाला आपण नक्कीच पराभूत करू शकतो.
डॉ. शेखर घोडेस्वार
एम. डी. (मेडीसीन), वैद्यकीय महाविद्यालय,यवतमाळ.

डॉक्‍टरांचेही युद्धच
कोरोना संकट काळात डॉक्‍टर एका सैनिकांप्रमाणेच युद्घ लढत आहेत. कोणत्याही कारणांचा पाढा वाचला जात नाही. केवळ आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले जात आहे. डॉक्‍टरांचा प्रत्यक्ष संपर्क रुग्णांशी येतो. त्यामुळे सामान्य नागरिक डॉक्‍टरांच्या संपर्कात येण्यास घाबरतात. त्यांना खोली भाड्याने दिली जात नाही. या काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांवर नेहमीप्रमाणेच उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाची काळजी घेतली जाते.
डॉ. अरविंद कुडमेथे
अपघात विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

डॉक्‍टरांचे कार्य कौतुकास्पद
कोरोनाच्या महामारीने जग व जीवन बदलून जाणार आहे. फ्रंटलाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्‍टरांचे कार्य कौतुकास्पद आहे. आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय करावी लागणार आहे. कोरोनाला घाबरून जायची गरज नाही. मात्र, कुणीही बेसावध राहायला नको. वेळोवेळी शासनाकडून सांगण्यात येणाऱ्या नियमांचे प्रत्येकाने पालन करायला हवे. मास्क ही गरजेची वस्तू झाली आहे. आम्ही आमचे कर्तव्य करीत आहोत. जनतेनेही काळजी घ्यावी.
डॉ. प्रशांत कसारे
सचिव, आयएमए, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com