esakal | पैशाच्या वादातून गुंडांचा धिंगाणा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पैशाच्या वादातून गुंडांचा धिंगाणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गणेशोत्सवाला प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येलाच नंगा पुतळा चौकात पैशांवरून उद्‌भवलेल्या वादात 10 ते 12 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांनी धिंगाणा घालत नाश्‍त्याच्या तीन ठेल्यांची तोडफोड केली. एका ठेल्याला आग लावली. दुकानदार नरेश अशोक तिवारी (42, रा. गांधीबाग) यांना चाकू मारून जखमी केले. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
अमित गजानन उगले (20, रा. वाठोडा गॅस गोदामाजवळ), सुरेंद्र उर्फ गोलू साहेबराव मस्के (22, रा. सतनामीनगर), आकाश विलास लांजेवार (19, रा. बिडगाव भांडेवाडी रोड), रौनक दिलीप ठवरे (21, रा. सतनामीनगर), यश नारायण गोस्वामी (18, रा. सतनामीनगर) व सचिन मितेंद्र सोळंकी (22, रा. बाबुळबन) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. नरेश तिवारी हे नंगा पुतळा चौकात दाबेलीचा ठेला लावतात. रात्री आठ वाजताच्या सुमारास चार युवक दुकानात नाश्‍ता करण्यासाठी आले. नाश्‍ता केल्यानंतर पैसे मागितले असता पैसे न देता दादागिरी करीत होते. पुन्हा पैसे मागितल्यास मारण्याची धमकीही दिली. दुकानदारांनी तहसीलचे ठाणेदार अजयकुमार मालवीय यांना माहिती दिली. यावेळी युवक पसार झाला तर तिघांना पोलिसांनी ठाण्यात आणले. दुकानदारही तक्रार देण्यासाठी ठाण्यात आले. पोलिसांना माहिती देऊन परतलेच होते की रात्री नऊ वाजताच्या सुमारास फरार झालेला युवक 10 ते 12 युवकांसह तेथे आला. परिसरातील दुकानदारांना मारहाण केली. तीन ठेल्यांची तोडफोड करून उलटवले. एका ठेल्याला आगही लावली. तसेच नरेश यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. पुन्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच आरोपी फरार झाले. घटनेच्या चार तासात तहसील पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.

loading image
go to top