व्यापाऱ्याची 27 लाखांनी फसवणूक; डॉन आंबेकरवर आणखी एक गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 November 2019

नागपूर : कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकरवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका सराफा व्यापाऱ्याला स्वस्तात सोने मिळवून देतो अशी बतावणी करून 27 लाख रुपयांनी फसवणूक केली. पैसे परत करण्यासाठी व्यापाऱ्याने तगादा लावला असता त्याला आपल्या कार्यालयात कोंडून मारहाण केली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी संतोष आंबेकर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

नागपूर : कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकरवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका सराफा व्यापाऱ्याला स्वस्तात सोने मिळवून देतो अशी बतावणी करून 27 लाख रुपयांनी फसवणूक केली. पैसे परत करण्यासाठी व्यापाऱ्याने तगादा लावला असता त्याला आपल्या कार्यालयात कोंडून मारहाण केली. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी संतोष आंबेकर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती येथे राहणारे जयेश धंधुकिया (35) हे सराफा आहेत. 3 ऑक्‍टोबर 2014 रोजी संतोष आणि जयेश यांची भेट झाली. त्यावेळी संतोषने जयेश यांना स्वस्त दरात सोने मिळवून देतो असे आमिष दाखविले होते. त्यानुसार जयेश यांनी संतोषला 27 लाख रुपये दिले होते. पैसे घेऊनदेखील संतोषने जयेश यांना सोने दिले नाही. जयेश यांनी पैसे परत करण्यासाठी संतोषमागे तगादा लावला होता. तरीही संतोषने पैसे परत केले नव्हते. जयेश यांनी पैशासाठी संतोषला धमकी दिली असता पैसे परत करतो असे बोलून त्यांना नागपूरला बोलविले. 20 नोव्हेंबर 2015 रोजी जयेश व त्यांच्या मित्रासह नागपूरला आले आणि संतोषच्या कार्यालयात गेले. त्यावेळी संतोष व त्याच्या साथीदारांनी जयेश यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे जयेश आणि त्यांच्या मित्राला कार्यालयात डांबून बेदम मारहाण केली. त्याचप्रमाणे त्यांना कार्यालयात कोंडून त्यांच्याजवळील मायक्रोमॅक्‍स कंपनीचा मोबाईल आणि रोख 29 हजार रुपये असा 38 हजारांचा माल हिसकावून घेतला. याप्रकरणी जयेश धंधुकिया यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी संतोष आंबेकर, गुड्डू उर्फ सुदीप शाहू, विपुलभाई, महेश उर्फ शरद शाहू, कृष्णा यांच्यावर 395, 420, 406, 342, 504, 506(ब), 323, 120(ब), सहकलम 3, 25 शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. संतोष आंबेकरवर आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले असून लकडगंज पोलिस ठाण्यात 4 गुन्हे दाखल झाले आहेत हे विशेष. 
व्यापाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न 
जयेश यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी रक्‍कम संतोषकडे दिली होती. परत मागितली असता संतोषने जयेश यांच्या डोक्‍याला पिस्तूल लावली. जीव वाचवून जयेश हे अरावतीला परतले. मात्र, लुटल्या गेल्यामुळे त्यांना नैराश्‍य आले. त्यांनी फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांनी वेळीच दवाखान्यात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. 
आंबेकरला चार दिवस पीसीआर 
लकडगंजमध्ये राहणाऱ्या डॉक्‍टर तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आज डॉन संतोष आंबेकरला न्यायालयात उपस्थित केले. आंबेकरला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. आतापर्यंत तीन गुन्ह्यांत आंबेकर पीसीआरमध्ये होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don santosh ambekar