डॉन संतोष आंबेकरची पाच कोटींची संपत्ती जप्त

डॉन संतोष आंबेकरची पाच कोटींची संपत्ती जप्त

नागपूर : कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकर याची बेहिशेबी आणि नावावर असलेली तब्बल पाच कोटींची संपत्ती गुन्हे शाखेने जप्त केली आहे. त्याच्या ताब्यातून कोट्यवधींमध्ये किंमत असलेल्या पाच कार आणि दोन बाइकचा समावेश आहे. आंबेकर आणि त्याच्या सात साथिदारांवर मोक्‍का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त आयुक्‍त नीलेश भरणे यांनी पत्रपरिषदेत दिली. 
कुख्यात संतोष आंबेकर याने गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांची पाच कोटींनी फसवणूक करून एक कोटीच्या खंडणी मागणी केली होती. तसेच गुजरातचे व्यापारी हेमंत पुरोहित याची नोटा बदली करून देण्याच्या नावावर 15 लाखांनी फसवणूक केली होती. तसेच बाल्या गावंडे हत्याकांडातील आरोपी जय काळे याला जामीन मिळवून देण्याच्या ऐवजी खंडणी आणि व्याज वसुली करीत होता. त्याने सराफा व्यापारी राजा अरमरकर याच्या माध्यमातून अनेक सराफा व्यापाऱ्यांना गंडा घातला आहे तर हवाला व्यापारात कोट्यवधींची कमाई केली आहे. त्याच्यावर लकडगंजमध्ये राहणाऱ्या एका डॉक्‍टर तरुणीवर वयाच्या सोळाव्या वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची मुंबईतील गर्लफ्रेंड जुही चौधरी हिला दिलेला महागडा फ्लॅट, कार, भूखंड आणि सोन्याच्या दागिन्यांसह अन्य मालमत्ता आंबेकरने दिली होती. अशाप्रकारे अनेक गुन्ह्यांमध्ये संतोष आंबेकर अडकला आहे. त्यामुळे त्याच्यासह सात साथिदारांवर गुन्हे शाखेने मोक्‍का लावला आहे. यामध्ये भाचा नीलेश केदार, चंदन चौधरी, जुही चौधरी (मुंबई), सराफा व्यापारी राजा अरमरकर, अंकित पटेल (अंकलेश्‍वर-गुजरात), अजय पटेल (सूरत-गुजरात), बालाजी फर्मचा हवाला व्यापारी अरविंद पटेल (सूरत-गुजरात) आणि अजय पटेल (मुंबई) यांचा समावेश आहे. बाल्या गावंडे, अनंता सोनी या गाजलेल्या हत्याकांडात आंबेकरचा हात होता. त्याच्या पापाचा घडा भरल्यानंतर गुन्हे शाखेने त्याच्या घरावर छापा मारत 5 कोटी 30 लाख 90 हजार रुपये किमतीच्या चैनीच्या सर्व वस्तू, कार, दुचाकी, सोने आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने, एसीपी किशोर जाधव, सुधीर नंदनवार, पीआय संतोष खांडेकर, नरेंद्र हिवरे उपस्थित होते. 
स्पोर्ट कार 90 लाखांची 
आंबेकर हा महागड्या कारमध्ये फिरण्याचा शौकीन आहे. त्यामुळे त्याने कोट्यवधींची उधळण आलिशान कारवर केली होती. त्यामध्ये वेस्ट बंगाल पासिंगच्या 90 लाख रुपये किंमतीच्या स्पोर्ट कारचा समावेश आहे. तर दोन महागड्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या. त्या दुचाकींची किंमत 7 व 8 लाख रुपये आहे. एकूण पाच कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 
पाठीराखे शिर्डी, अजमेरला 
डॉन आंबेकरची धुलाई आणि रस्त्यावरून काढलेली वरात पाहता स्वतःला आंबेकरचे नंबरकारी समजणाऱ्या जवळपास शंभरावर झोपडपट्‌टी गुंडांनी शहर सोडले आहे. त्यांनी थेट शिर्डी आणि अजमेर शहर गाठले आहेत. तेथील धर्मशाळा किंवा छोट्यामोठ्या लॉजमध्ये त्यांनी आसरा घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आंबेकरची पाठराखण करणाऱ्या काही राजकीय छुटपूट नेत्यांनीही आंबेकरकडे पाठ फिरवली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com