बेवडे म्हणती... गड्या रे, अपुले गावखेडे बरे! 

file photo
file photo

पुसद (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या 'लॉक डाऊन'मुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. त्यातच पानटपऱ्या बंद झाल्याने तंबाखू, गुटखा शौकिनांची गळचेपी झाली, तर दारूची दुकाने बंद झाल्याने दारुड्यांची अक्षरशः कोंडी झाली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या बेवड्यांची दारूअभावी जिवाची प्रचंड तगमग होत आहे. अशातच शहरातील दारुड्यांनी आपला मोर्चा गावखेड्यांकडे वळविला आहे. आजूबाजूच्या गावांत मोहाची अस्सल दारू मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने दारूडे गावखेड्यात जाऊन दारूच्या नशेने तर्र होऊन ' गो कोरोना...गो कोरोना' असे बरळत आहेत. 

 'एकच प्याला'साठी  शक्कल

शहरात दारूच्या व्यसनात बुडालेली लोकसंख्या मोठी आहे. दारू पिल्याशिवाय शरीर यंत्रणा कामच करू शकत नाही, अशी अनेकांची अवस्था आहे. त्यामुळे दारूच्या 'एकच प्याला'साठी बेवडे कोणती शक्कल लढवतील, याचा नेम नाही. कोरोनामुळे या नशा बहाद्दरांवर मोठे संकट कोसळले आहे. संचारबंदीमुळे शहरातील सारीच दुकाने बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली खरी. परंतु, त्यावर त्यांनी उपाय न शोधला तर ते खरे बेवडे कुठले?. दारूचा पेला मिळविण्यासाठी बेवड्यांनी आता ग्रामीण भागाची वाट धरली आहे. वनवारला, कारला, जांब तांडा, जांब बाजार, गायमुखनगर अशा पुसद शहरालगतच्या गावखेड्यांमध्ये गावठी दारू गाळण्याच्या कामाला मोठा वेग आला आहे. नदीकाठी, झुडपात, कुठे उघड्यावर दारूभट्टी खुलेआमपणे सुरू आहेत. 

बेवड्यांनी आता गावखेड्यातच बस्तान

त्यामुळे अस्सल मोहाची दारू सहज उपलब्ध होत आहे. ही बाब नेमकी हेरून बेवड्यांनी आता गावखेड्यातच बस्तान मांडले आहे. दुचाकीने अथवा मिळेल त्या वाहनाने सैरभैर झालेले दारूचे शौकीन हातभट्ट्यांजवळ स्थिरावत आहेत. बेवड्यांच्या गर्दीमुळे दारूभट्टीचालकांना 'अच्छे दिन' आले असले तरी गावकरी मात्र, या अनाहूत गर्दीमुळे कोरोनाच्या भीतीपोटी अस्वस्थ झाले आहेत. दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी वनवारला येथील पोलिस पाटलांनी पुसद ग्रामीण पोलिसांकडे केली आहे. परंतु, अद्यापपर्यंत पोलिस यंत्रणेला जाग आलेली नाही. त्यामुळे गावकरी मात्र, त्रस्त झाले आहेत. 

पोलिसांकडून तातडीने कारवाईची अपेक्षा 

गावखेड्यातील या दारूभट्टीत मोहाची शुद्ध दारू गाळण्यात येते. या दारूचा एक ग्लास 30 रुपयाला मिळतो. पुसद शहरातून आलेले बेवडे दारूच्या नशेत तर्र होतात. काही जागेवर लोळतात. या दारू दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती वाटते. तक्रार करूनही पोलिस मात्र, कुठलीही कारवाई करीत नाहीत. शहरातून खेड्यात येणाऱ्या बेवड्यांचा व दारू गाळणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी गावखेड्यांतील लोकांची मागणी आहे. संचारबंदीचा फायदा घेत गावठी दारू यंत्रणा उद्‌ध्वस्त केल्यास कोरोना विरोधातील लढाईत एक पाऊल पुढे टाकता येईल, अशी मागणी वनवारला येथील पोलिस पाटलांनी 'सकाळ'जवळ व्यक्त केली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com