esakal | सत्तेत येताच ‘वंचित’ने गुंडाळले डॉ. आंबेडकरांच्या नावाचे अभियान!
sakal

बोलून बातमी शोधा

water_crisis.jpg

सत्तेत येताच ‘वंचित’ने गुंडाळले डॉ. आंबेडकरांच्या नावाचे अभियान!

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला : दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने प्रशासकाच्या काळात सुरू केलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह पाणीपुरवठा अभियान भारिप-बमसंच्या सत्ताधाऱ्यांनी गुंडाळले आहे. 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या समाज कल्याण समितीच्या सभेत यासंबंधीचा ठराव घेण्यात आला. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करून सत्ता मिळवल्यानंतर भारिप-बमसंच्या (अर्थात वंचित बहुजन आघाडी) सत्ताधाऱ्यांनीच अभियान रद्द केल्यामुळे सत्ताधाऱ्यांना नेमके कोणाचे कल्याण करायचे आहे, यासंबंधी चर्चेला उधाण आले आहे. 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक विकास योजनेअंतर्गत (दलित वस्ती) गावांमध्ये रस्ता, नाली, पथदिवे, पाणीपुरवठा, सभागृहांवर खर्च करण्यात येते. त्याअंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेने दलित वस्ती सुधार योजनेतून ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह पाणी पुरवठा अभियान’ राबविण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी सन् 2019-20 साठी प्राप्त 49 कोटी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठ्याच्या कामांवर प्राधान्याने खर्च करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले होते.

योजना राबविण्याआधी दलित वस्तीच्या निधीतून काम न झालेल्या वस्त्यांचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्वेक्षण केले होते. संबंधित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रशासकाच्या काळात सुरू करण्यात आलेले सदर अभियान सत्तेत आल्यानंतर भारिपच्या सत्ताधाऱ्यांनीच रद्द केले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना नेमके कोणाचे कल्याण करायचे आहे, यासंबंधी तर्क-वितर्क लावल्या जात आहेत. 

वस्त्यांचे केले होते सर्वेक्षण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह पाणीपुरवठा अभियान राबविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वस्त्यांचे सर्वेक्षण केले होते. त्याअंतर्गत 373 पैकी केवळ 75 वस्त्याच पात्र ठरल्या होत्या. 298 वस्त्या अपात्र ठरल्यामुळे योजनेसाठी दीडशे वस्त्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यासंबंधिचा अहवाल सुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नुकताच समाज कल्याण विभागाला दिला होता. परंतु त्यावर कार्यवाही करण्यापूर्वीच योजना रद्द करण्यात आली आहे. 

समितीने सर्वानुमते घेतला रद्द करण्याचा ठराव
समाज कल्याण कल्याण समितीने 25 फेब्रुवारी रोजी घेतल्या ठरावानुसार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेसंदर्भात सन् 2019-20 मधील प्राप्त निधीचे सन् 2018-19 ते 2022-23 च्या कृती आराखड्यामध्ये समाविष्ट पाणीपुरवठ्याची कामे घेण्याबाबत ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितींमार्फत प्रस्ताव सादर करण्याचे कळविले होते. तरीपण अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे सामाविष्ट पाणीपुरवठ्याची कामे घेण्याबाबत आवश्‍यकता दिसून येत नाही. करिता २७  ऑगस्ट २०१९ चा ठराव क्रमांक दोन नुसार पाणीपुरवठ्याचा कामांबाबतचा घेण्यात आलेला ठराव व त्याबद्दलची केलेली कार्यवाही रद्द करण्यात सभा सर्वानुमते ठराव घेत आहे. 

मोदींच्या अभियानाला बळ देणारी होती योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जल शक्ती’ अभियानाद्वारे देशातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात या अभियाला बळ देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह पाणीपुरवठा अभियान’ राबविण्याचे नियोजन प्रशासकीय राजवटीत करण्यात आले होते. परंतु आधी विधासनभा व नंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत सदर योजनेला दिरंगाईचा फटका बसला. त्यातच आता अभियन राबविण्याचा ठरावच रद्द केल्यामुळे योजना सुद्धा रद्द झाली आहे. 

समितीने घेतला निर्णय
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेसंदर्भात सन् 2019-20 मधील प्राप्त निधीतून पाणीपुरवठ्याची कामे घेण्याबाबत ठराव प्रशासकांच्या काळात घेण्यात आला होता. परंतु आता समितीने सदर ठराव रद्द केला आहे. त्यामुळे आता दलित वस्तीच्या निधीचे नव्याने नियोजन करण्यात येईल. 
- आर.एस. वसतकार
प्रभारी समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद, अकोला

loading image