शिक्षक मतदारसंघ : अमरावतीतून डॉ. नितीन धांडे भाजपचे उमेदवार

सुरेंद्र चापोरकर
Monday, 9 November 2020

राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडीचे उमेदवार मंगळवारी जाहीर होणार आहेत. राष्ट्रीय पक्ष प्रत्यक्षपणे शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरल्याने उमेदवारांत चांगलीच चुरस वाढण्याचे संकेत आहेत.

अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये अमरावतीच्या डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

डॉ. नितीन धांडे हे विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच अधिकृतपणे आपला उमेदवार रिंगणात आणला आहे.

क्लिक करा - सरकार परत घेणार शेतकऱ्यांचा ‘सन्मान’; तुमचा तर यात समावेश नाही ना

यासोबतच राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडीचे उमेदवार मंगळवारी जाहीर होणार आहेत. राष्ट्रीय पक्ष प्रत्यक्षपणे शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरल्याने उमेदवारांत चांगलीच चुरस वाढण्याचे संकेत आहेत.

डॉ. नितीन धांडे हे गेल्या सहा वर्षांपासून विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आहेत. अमरावतीच्या श्रीशिवाजी शिक्षण संस्थेनंतर ही सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था असल्याचे मानले जाते.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

कोणत्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार?

भाजपकडून अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे धांडे यांना कोणत्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिक्षक संघटनांचे बळ महत्त्वाचे ठरणार

शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत शिक्षक संघटनांचे बळ अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, काही प्रस्थापित संघटनांचे एकाच विचारसरणीचे दोन उमेदवार रिंगणात येण्याचे संकेत आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांवप सातत्याने लढा देणाऱ्या काही संघटना खिळखिळ्या झाल्याची चर्चा असून त्याचा लाभ उचलण्याची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Nitin Dhande is the BJP candidate