esakal | एका पोलिस अधीक्षकाचे स्वप्न, ‘पोलिस ठाणे महिलांना माहेर, तर मुलांना आजोळ वाटेल असे बणविणार!’ 
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Dilip Pati

डॉ. भुजबळ म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात असताना स्त्री अत्याचार कमी करण्यासाठी ‘कळी उमलताना’ हा प्रकल्प राबविला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आपल्या जिल्ह्यातही अशाच पद्धतीचे काही प्रकल्प येत्या काही काळात सुरू करण्यात येतील.

एका पोलिस अधीक्षकाचे स्वप्न, ‘पोलिस ठाणे महिलांना माहेर, तर मुलांना आजोळ वाटेल असे बणविणार!’ 

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : समाजामध्ये पोलिस ठाण्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेला तक्रारकर्ता, पीडितांना हे ठिकाण आश्‍वासक वाटेल असे प्रयत्न राहणार आहेत. पोलिस ठाणे हे महिलांना माहेर, तर लहान मुलांना आजोळ वाटेल, अशा पद्धतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच भ्रष्टाचारमुक्त पोलिस प्रशासनाची सुरुवात मी माझ्यापासूनच करणार आहे, असा संकल्प नवनियुक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी व्यक्त केला. 

येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी (ता. दोन) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून यापुढे जिल्ह्यात काम होणार आहे. मूळ पोलिस नियमानुसारच सर्व कामे होतील. याशिवाय नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. गुन्हेगारी कमी करणे, शांतता व कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे काम आहेच. यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. 

डॉ. भुजबळ म्हणाले, बुलडाणा जिल्ह्यात असताना स्त्री अत्याचार कमी करण्यासाठी ‘कळी उमलताना’ हा प्रकल्प राबविला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आपल्या जिल्ह्यातही अशाच पद्धतीचे काही प्रकल्प येत्या काही काळात सुरू करण्यात येतील. पोलिस प्रशासन निःपक्षपातीपणे काम करीत असते. यापुढेही अशाच पद्धतीने काम करण्यावर भर आहे. जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.

जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांचा सल्ला
 

त्यांना कायमस्वरूपी आळा घालण्याचे आदेश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. आदेश दिल्यानंतर सर्वच बंद होईल, अशातला भाग नाही. त्यावेळी मी माझ्या पद्धतीने काम करेल, असा इशाराही अधीक्षक भुजबळ यांनी अवैध धंद्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्याची माहिती घेतली आहे. त्यानुसार पुढील नियोजन केले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. 

नैसर्गिक साधनसंपत्तीतून आदिवासी होताहेत समृद्ध; बांबूने दिला जगण्याचा आधार

 

पोलिसांसाठी दोन कोविड केअर सेंटर 

बुलडाणा जिल्ह्यात पोलिस दलात ‘मीच माझा रक्षक’ ही मोहीम राबविली होती. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. नागरिकांचाही याला पाठिंबा मिळाला. जिल्ह्यात १३ अधिकारी व १३६ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पांढरकवडा येथे १५ खाटांचे व यवतमाळ येथे ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी ऑक्‍सिजन व इतर सुविधा असणार आहेत. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या भेटी या ठिकाणी होणार आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ म्हणाले.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर