एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या...उच्च अधिकारी बनण्याचे युवकांचे स्वप्न धुळीस मिळाले

प्रभाकर कोळसे
Tuesday, 1 September 2020

कोणतीच मागणी अथवा चर्चा नसताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय योग्य नसल्याची काही उमेदवारांचे म्हणणे आहे. अशा कालावधीत काही उमेदवारांची वयोमर्यादा संपणार आहे. अशांना आयोगाच्या पुढच्या परीक्षेस बसता येणार नाही.

नंदोरी (जि. वर्धा) : कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचा फटका जे उमेदवार वयोमर्यादेच्या काठावर आहेत, त्यांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर अशा उमेदवारांना आयोगाच्या पुढच्या परीक्षेसाठी संधी देण्याची मागणी होत आहे.

 

कोरोनाचे गहिरे संकट लक्षात घेता राज्य शासनाने एमपीएससीच्या सर्व परीक्षा लांबणीवर टाकल्या. परीक्षेची अंतिम तयारी टप्प्यात आली असताना आणि उमेदवारांनी परीक्षेची सर्व तयारी केली असतानाच अचानकपणे राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयाच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे; तर काही उमेदवारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय योग्य नाही

कोणतीच मागणी अथवा चर्चा नसताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय योग्य नसल्याची काही उमेदवारांचे म्हणणे आहे. जे उमेदवार पाच सहा वर्ष स्पर्धापरीक्षेची तयारी करीत आहेत. त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला आहे. या निर्णयाने काही उमेदवार निराशेच्या गर्तेत जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

पुढच्या परीक्षेत बसता येणार नाही

एमपीएससीची २० सप्टेंबर रोजी परीक्षा होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्या सर्व उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर अन्य परीक्षाही लांबणीवर पडणार आहेत, अशा कालावधीत काही उमेदवारांची वयोमर्यादा संपणार आहे. अशांना आयोगाच्या पुढच्या परीक्षेस बसता येणार नाही. त्यामुळे ही वयोमर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी होत आहे.

जाणून घ्या : मोठी बातमी : घर खरेदीच्या प्रयत्नात असलेल्यांना मिळणार दिलासा, वाचा सविस्तर

वयोमर्यादेत शिथिलता आणणे आवश्‍यक
आता आयोगाच्या सर्व परीक्षा लांबणीवर पडणार हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत काही उमेदवारांची परीक्षेसाठी वयोमर्यादा संपेल त्या उमेदवारांना पुढची परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादेत शिथिलता आणणे आवश्‍यक आहे.
- अतुल तेजणे, परीक्षार्थी.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dream of the youth to become a high official was shattered