गडचिरोलीच्या दुर्गम भागातील 21 गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

अलीकडच्या दोन-तीन वर्षांपासून काही गावांमध्ये अनिकेत आमटे यांच्या नेतृत्वात तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. लोक बिरादरी प्रकल्पाने आतापर्यंत भामरागड तालुक्‍यातील विविध गावांत 21 तलावांची निर्मिती केली आहे.

गडचिरोली : समाजसेवेचा वसा घेतलेल्या थोर समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या पुढाकाराने भामरागड तालुक्‍यातील दुर्गम 21 गावामध्ये तलावाचे बांधकाम करण्यात आले. या सुविधेमुळे आदिवासींना पिण्याचे पाणी तसेच मासेमारीतून रोजगार उपलब्ध झाला आहे. 

भामरागड तालुक्‍याच्या अभावग्रस्त भागात आरोग्य सेवा आणि आदिवासींच्या मुलांना उत्तम प्रकारचे शिक्षण देण्याचे अव्याहत काम लोकबिरादरी प्रकल्प मागील 47 वर्षांपासून करीत आहे. गरीब आदिवासी अन्नधान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी अलीकडच्या दोन-तीन वर्षांपासून काही गावांमध्ये अनिकेत आमटे यांच्या नेतृत्वात तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. लोक बिरादरी प्रकल्पाने आतापर्यंत भामरागड तालुक्‍यातील विविध गावांत 21 तलावांची निर्मिती केली आहे.

हेही वाचा - गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा असाही झाला शेवट...

नवीन तलावाच्या बांधकामामुळे मासेमारीतून आदिवासींना मिळणार रोजगार
टाळेबंदीपूर्वी मार्च महिन्यात भामरागड तालुक्‍यातील परायनार या गावात तलावाची निर्मिती पूर्ण केली आहे.भामरागड तालुक्‍यासोबतच अहेरी तालुक्‍यातील मेडपल्ली गावात नवीन तलाव निर्मितीच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. तहसील कार्यालयाकडून कायदेशीर परवानगी घेऊन हे काम सुरू केले आहे. अहेरी तालुक्‍यातील हा पहिलाच तलाव आहे. यात 15 टक्‍के गावाचा सहभाग आहे. यंदाचे हे शेवटचे काम आहे. 

गरिबांचे कोरोनापासून रक्षण व्हावे

अडीच हजार मास्कचे गोरगरिबांना वाटप लोकबिरादरी प्रकल्पातील महिला कार्यकर्त्यांनी तब्बल अडीच हजार मास्क बनवून गोरगरीब नागरिकांना ते मोफत वाटप केले आहेत. तलावाच्या कामावरील मजूर आणि गावातील आदिवासी नागरिकांनाही याचा लाभ देण्यात आला. गोरगरिबांचे कोरोनापासून रक्षण व्हावे, यासाठी मास्क वाटप करीत असल्याचे अनिकेत आमटे यांनी सांगितले. विकासापासून कोसो दूर असलेला भामरागड तालुका लोकबिरादरी प्रकल्पाच्या सामिाजक कामाने देशभरात परिचित झाला आहे. आरोग्य सेवेसोबतच शिक्षण तसेच पाण्यासारख्या समस्येला मदतीचा हात दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drinking water problem of gadchiroli tribal villeges to be solved