esakal | गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा असाही झाला शेवट... 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhandara

सोमवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला शेतशिवारातील तणसाच्या ढिगाऱ्यातून पाय बाहेर निघालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याने घाबरून थेट गावाकडे धाव घेतली. यासंदर्भात माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा असाही झाला शेवट... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जवाहरनगर (जि. भंडारा) : गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी, 4 मे रोजी सकाळी सावरी/राजेदहेगाव शिवारात उघडकीस आली. विलास रमेश सुखदेवे (वय 26) असे मृताचे नाव आहे. तो नागपूरचा मूळ निवासी असून सध्या सावरी इंदिरानगर येथे मावशीकडे राहत होता. 

सोमवारी सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला शेतशिवारातील तणसाच्या ढिगाऱ्यातून पाय बाहेर निघालेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याने घाबरून थेट गावाकडे धाव घेतली. यासंदर्भात माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांनासुद्धा पाचारण करण्यात आले. परंतु, श्‍वानपथकाला काही माग काढता आला नाही. घटनास्थळावर दोन प्लॅस्टिकचे रिकामे ग्लास व एक बॉटल आढळून आली. घटनास्थळी मृतासोबत दुसरी व्यक्तीसुद्धा होती. पोलिसांनी तणस बाजूला सारून मृतदेह बाहेर काढला. त्याचे डोके ठेचल्याने मृतदेह रक्ताचा थारोळ्यात पडून होता. बाजूलाच रक्त लागलेले दोन मोठे दगड पडून होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. 


अवश्य वाचा-  लॉकडाउनने बैलबाजार बंद केला हो! कशी होणार मशागतीची कामे? 

चौकशीसाठी पाच संशयित ताब्यात 

जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटना घडण्यापूर्वी विलास व काही मित्रांमध्ये पार्टीसुद्धा झाल्याचे समजते. चौकशी करण्यासाठी विलासच्या संपर्कात असलेल्या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माहितीनुसार विलास हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर नागपूर व जवाहरनगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. नेमक्‍या कोणत्या कारणावरून त्याचा खून झाला, याचा तपास ठाणेदार बारसे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी करीत आहेत. 

कपड्यांवरून पटली ओळख 

मृताच्या अंगावर असलेल्या कपड्यांवरून त्याची ओळख पटविण्यात आली. मृत विलास सुखदेवे हा मूळचा नागपूरचा रहिवासी असून सध्या सावरी येथील इंदिरानगरात मावशी निर्मला बन्सोड यांच्याकडे राहत होता. तो शुक्रवारी सायंकाळीच घराबाहेर पडला होता, तेव्हापासून घरी परतला नाही. मित्रांसोबत बाहेरगावी गेला असावा, असा घरच्यांचा समज झाला. सोमवारी सकाळी दहा वाजता नरेश शर्मा यांच्या राजेदहेगाव शेतशिवारातील खताच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह गुराख्याला आढळला. अत्यंत निघृणपणे दगडाने डोके व चेहरा ठेचून विलासचा खून करण्यात आला होता. मृतदेह खड्ड्यात टाकून त्यावर तणस झाकण्यात आले होते. 
 

loading image