गर्भवती महिलेला शासकीय वाहनाने घेऊन आला; तरी चालकाला पोलिसांनी केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण अंतर्गत येत असलेल्या ग्राम नेर येथील गर्भवती महिलेला पंचगव्हाण येथील रुग्णालयांमध्ये भरती न करता तेथील डॉक्टरांनी परस्पर नेर येथून अकोला येथे रेफर करण्यास सांगितले होते.

पंचगव्हाण (जि. अकोला) : तेल्हारा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण येथील शासकीय वाहनावर कंत्राटी पद्धतीने असलेले वाहन चालक गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी लेडी हार्डींगमध्ये घेऊन शुक्रवारी (ता.27) आले होते. दुपारी अडीच दरम्यान पोलिसांनी दमदाटी करून वाहनचालकास मारहाण केली असल्याची तक्रार वाहन चालकांने रामदासपेठ पोलिस ठाण्यांत केली आहे. याप्रकरणाचा गांभीर्याने विचार करून चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांनी दिली.

सविस्तर वृत्त असे की, प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण अंतर्गत येत असलेल्या ग्राम नेर येथील गर्भवती महिलेला पंचगव्हाण येथील रुग्णालयांमध्ये भरती न करता तेथील डॉक्टरांनी परस्पर नेर येथून अकोला येथे रेफर करण्यास सांगितले होते. अकोला येथील लेडी हार्डिंग येथे रेफर केले असता शासकीय वाहनातून अकोला येथे नेले. मात्र कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने काही पोलिस कर्मचाऱ्यांनी शासकीय वाहनांवर असलेले वाहन चालक चंद्रशेखर देशमुख यांना अकोला स्त्री रूग्णालयाजवळ अडवले. या वाहनामध्ये गर्भवती महिला, आशा,वाहन चालक,गर्भवती महिलेचा भाऊ हे होते. 

हेही वाचा - दुदैवच : पोलिसांसाठी शासनाकडे सॅनिटायझर व मास्कचीही तरतूद नाही 

यावेळी पोलिसांनी वाहनचालकाला विचारपूस केली असता ‘मी आरोग्य केंद्र पंचगव्हाण येथील शासकीय गाडीवरील वाहन चालक असून, प्रसूती रुग्ण स्त्री रुग्णालय अकोला येथे आणलेला आहे. माझ्याकडे रेफर सर्टीफिकेट सुद्धा आहे. असे सांगून सुद्धा पोलिसांनी एक न आईकता वाहन चालकाला बेदम मारहाण केली. त्यांनी या घटनेची माहिती रामदासपेठ पोलिस स्टेशन अकोला येथे दिली असता त्यांनी तक्रार न घेता दमदाटी करून पळून लावल्याचा आरोप वाहनचालकाने केला आहे.  यानंतर घटनेची माहिती पंचगव्हाण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना दिली व त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली सदर घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी वाहनचालक यांनी केली आहे.

आवश्‍यक वाचा - डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आता मिळणार नाही हे औषध

‘त्या’ प्रकरणाची सखोल चौकशी
रामदासपेठ पोलिसांनी मारहाण केली अशी कुठल्याच तक्रार पोलिस ठाण्यांत दाखल नाही. विशेष म्हणजे लेडी हार्डींगसमोर कर्मचारी तैनात करण्यात आले नाही. तरीही असा काही प्रकार घडला असेल तर त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
-मुकुंद ठाकरे, पोलिस निरीक्षक, रामदासपेठ, अकोला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The driver was beaten by police