व्रतवैकल्यांचा श्रावण यंदाही जाणार सुनासुनाच...काय असावे कारण...वाचा सविस्तर

मिलिंद उमरे
Wednesday, 22 July 2020

रावणमास सुरू होताच या मंदिरांचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून जातो. विविध प्रकारच्या पूजा, अनुष्ठाने, धार्मिक विधी सुरू असतात. पण, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ही मंदिरे आता ओस पडली आहेत.

गडचिरोली : रिमझिमणारा पाऊस, हिरवीगार झालेली वसुंधरा, आकाश, धरणीचा उन्ह-सावलीचा खेळ, असे रम्य वातावरण घेऊन श्रावणमासाला प्रारंभ झाला आहे. खरेतर श्रावणमास निसर्गाच्या रंगांची मुक्त उधळण करण्यासोबतच भक्तिरसाचा पूर आणतो. या महिन्यापासून पुढील चार महिने अर्थात चातुर्मासात सर्वत्र भक्तिमय वातावरण असते. मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेली असतात. पण, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरे ओस पडू लागली आहेत. खरे तर आता मंदिरांनाच भक्तांच्या दर्शनाची आस लागली आहे.

 

भाविकांची गर्दी खेचणारे धार्मिक स्थळे

 

गडचिरोली जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध तीर्थस्थळे आहेत. प्राचीन हेमाडपंती स्थापत्य शैलीचे मार्कंडेश्‍वर मंदिर, तेलंगणा व महाराष्ट्रातील भक्तांमध्ये दुवा साधणारे कालेश्‍वर देवस्थान, कार्तिकस्वामी महाराजांच्या साधनेने पावन झालेले चपराळा येथील प्रशांतधाम देवस्थान, धानोरा तालुक्‍यातील भवरागड, टिपागड, आरमोरी येथील भंडारेश्‍वर मंदिर, कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा, अरतोंडी अशा मोठ्या पवित्र स्थळांसह गोगाव येथील नागोबा मंदिरांसारखी छोटी; पण भक्तांची गर्दी असणारी अनेक मंदिरे आहेत.

पूजा साहित्य विक्रेत्यांनाही फटका

श्रावणमास सुरू होताच या मंदिरांचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून जातो. विविध प्रकारच्या पूजा, अनुष्ठाने, धार्मिक विधी सुरू असतात. अनेकजण वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता या पवित्र नद्यांवर स्नान करायलाही येतात. त्यामुळे या काळात या मंदिरांच्या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पूजा साहित्य विकणारे, देवतांच्या प्रतिमांची विक्री करणारे, शिवलिंग, दगडी शिल्प तयार करणारे, विविध खाद्यपदार्थ विक्रेते, खेळणी विक्रेते, अशा अनेक किरकोळ विक्रेत्यांना या महिन्यापासून पुढील तीन महिने काही प्रमाणात रोजगार मिळतो. पण, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ही मंदिरे आता ओस पडली आहेत.

हेही वाचा : युवक दारू पिऊन आला अन्‌ विलगीकरण कक्षात घुसून केला वृद्धेचा विनयभंग, वार्ता पसरताच...

मार्कंडेश्‍वर मंदिरात पूजा, अभिषेकाची मागणी

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्‍यातील मार्कंडेश्‍वर देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात अभिषेक पूजा करायची आहे. परंतु, यावर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने अभिषेक पूजा करणे बंद आहे. त्यामुळे या मंदिरात पूजा, अभिषेक करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
श्रावणमासात महिनाभर पूजा, अभिषेक हा जोडप्याने (पती-पत्नी)ने करायचा आहे. या अभिषेक पूजेसाठी साधारण एक तास लागतो. यावर्षी प्रत्येक जोडप्यास पूजा करण्याकरिता आपणाकडून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मार्कंडेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे यांनी निवेदनातून केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Corona, worship was also closed in the temples in Shravan