esakal | सर्व वाहतूक बंद असल्याने त्याने केला 130 किलोमीटर पायी प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

Sindewahi

सोमवारी तो नागपुरातून पायदळ सिंदेवाहीला येण्यास निघाला. बुधवारी तो रात्री सिंदेवाही येथील शिवाजी चौकात पोहोचला. गस्तीवर असेलल्या पोलिसांना तो दिसला. पोलिसांना त्याच्याकडे पाहून हा कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याचे वाटले.

सर्व वाहतूक बंद असल्याने त्याने केला 130 किलोमीटर पायी प्रवास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंदेवाही (जि. चंद्रपूर)  : देशात संचारबंदी लागू झाल्याने सर्व कंपन्यांना टाळे लागले आहे. त्यामुळे आता कामगार, मजूर गावाकडे निघाले आहेत. अशाच एका मजुराने नागपूर ते चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही असा 130 किलोमीटरचा प्रवास पायी केला. हे अंतर कापायला त्याला दोन दिवस लागले. नरेंद्र विजय शेळके असे पायदळ प्रवास करणाऱ्या मजुराचे नाव आहे. 

अवश्य वाचा- तरुणांनी लढवली वेगळीच शक्कल, अन् सापडले पोलिसांच्या तावडीत

सावली तालुक्‍यात येत असलेल्या जांब येथील नरेंद्र विजय शेळके हा नागपुरात एका कंपनीत कामावर होता. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व उद्योग काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. हातालाच काम नसल्याने नागपुरात राहून तरी काय करायचे, या विचाराने नरेंद्रने गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. मात्र, बससेवा, रेल्वेसेवा बंद. खासगी वाहनांवरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे नरेंद्रने पायदळच गाव गाठण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांकडून सखोल चौकशी

सोमवारी तो नागपुरातून पायदळ सिंदेवाहीला येण्यास निघाला. बुधवारी तो रात्री सिंदेवाही येथील शिवाजी चौकात पोहोचला. गस्तीवर असेलल्या पोलिसांना तो दिसला. पोलिसांना त्याच्याकडे पाहून हा कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याचे वाटले. त्यानंतर त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने आपण नागपुरातून आलो असल्याचे सांगितले. त्याला आधी ग्रामीण रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच होमक्वारंनटाईनचा शिक्का मारण्यात आला. दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला जेवण दिले. त्यानंतर त्याला गावात पोहोचविण्यात आले.  

 
 

loading image