file photo
file photo

वाघाच्या मृत्यूसह बेपत्ता होण्याचे गूढ कायम

पवनी (जि. भंडारा) : जिल्ह्यातील पवनी व नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, भिवापूर येथील वन्यक्षेत्र मिळून उमरेड-पवनी-कऱ्हांडला या अभयारण्याची निर्मिती 2013मध्ये करण्यात आली. या अभयारण्यातील जय, जयचंद हे जानदार वाघ अचानक बेपत्ता झाले. याच वर्षी
येथील चार्जर आणि राही या दोन वाघांना विषप्रयोग करून ठार मारण्यात आले. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणसह अभयारण्याची शोभा वाढविणाऱ्या वाघांची संख्या घटल्याने त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून गूढही वाढले आहे.
189 वर्ग किलोमीटर पसरलेल्या अभयारण्यात पवनी गेट प्रसिद्ध आहे. पवनी परिसरात आशिया खंडातील सर्वांत मोठा वाघ म्हणून मान्यता पावलेल्या "जय' वाघाचे वास्तव्य होते .
"जय' गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी येथील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याच्या वन्यजीव वनपरिक्षेत्रात दाखल झाला होता. भारदस्त शरीरयष्टी, देखणेपण, चेहऱ्याची सुंदरता व विलक्षण चपळाई, पाच फूट लांबी आदी गुणांनी काही दिवसातच "जय' वाघ या अभयारण्याचा सेलिब्रिटी ठरला होता. "जय'ने अभयारण्याच्या जंगलाशिवाय आपले फिरण्याचे क्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या नागभीड, ब्रह्मपुरीपर्यंतच्या जंगलात वाढविले होते. त्यामुळे डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेतील डॉ. बिलाल हबीब यांच्या नेतृत्वाखालील चमूने जयला दोनदा रेडिओ आयडी कॉलर लावले होते. सर्वांनाच वेड लावणारा हा वाघ 16 एप्रिल 2016 पासून अचानक बेपत्ता झाला. तीन वर्षे होऊनही राज्य सरकार, वनविभाग, व्याघ्र प्रकल्प, केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा "जय'ला शोधण्यात सपशेल फेल ठरल्या आहेत. "जय'चे बेपत्ता होण्यामागील रहस्य कायम असतानाच पवनी वनक्षेत्रातील जय व चांदीचे अपत्य असणाऱ्या जयचंद वाघाने ही उणीव भरून काढली. पर्यटकांना भुरळ घालणारा जयचंद तोही अचानक बेपत्ता झाला. त्याचे शेवटचे लोकेशन फेब्रुवारी 2018 मध्ये ब्रह्मपुरी (जिल्हा चंद्रपूर) वन परिक्षेत्रात आढळून आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला उमरेड -पवनी -कऱ्हांडला अभयारण्यातील "चार्जर व राही' यांचा विषप्रयोग केल्याने मृत्यू झाला. जय, जयचंद यांचा सुगावा नाही. चार्जर, राही यांचा मृत्यू झाल्याने या अभयारण्यातील व्याघ्रशोभा हरपली आहे. वाघ दिसत नसल्याने हळूहळू पर्यटकांची संख्यासुद्धा रोडावली. त्यामुळे पर्यटन व्यवसायावरसुद्धा प्रतिकूल परिणाम होत आहे. यासाठी वनविभाग व शासनाने व्याघ्रसुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
मानव वन्यजीव संघर्ष
पवनी तालुक्‍यातील खापरी, गायडोंगरी, परसोडी, चिचखेडा, पाहुणगाव यासह अन्य गावे अजूनही अभयारण्याच्या पोटात आहेत. या गावांसाठी अभयारण्यातूनच रस्ता आहे. अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन केल्यास मानव-वन्यजीव संघर्ष टाळता येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com