आत्म्यासोबत जायचे असल्याने जीवन संपविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता, त्याच्यासोबत जायचे असल्याने आपण जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. 

नागपूर - डोळ्यासमोर अपघात बघितल्याने मनावर परिणाम झालेल्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याचा आत्मा आपल्याला बोलवत होता, त्याच्यासोबत जायचे असल्याने आपण जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. 

सौरव यशवंत नागपूरकर (वय १९, रा. तीन नल चौक, कसाबपुरा) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तहसील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव प्रियदर्शिनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. वडील एनसीसीत कार्यरत आहेत. आई गृहिणी तर मोठी बहीण शिक्षण घेत आहे. घरात पूर्वीपासूनच धार्मिक वातावरण असल्यामुळे सौरवचा देवावर विश्‍वास होता. दोन महिन्यांपूर्वी सौरवसमोरच एक अपघात झाला. यात २० वर्षीय तरुण जागीच ठार झाला. त्या अपघाताचा त्याने मोठा धसका घेतला होता. घरी येऊन अपघाताबाबत आईवडिलांना सांगितले तेव्हापासून तो तणावात होता. 

दुसऱ्या दिवशीपासून अपघातात ठार झालेल्या युवकाचा आत्मा आपल्याला भेटायला आला, असे सौरवने सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. त्याचा आत्मा आपल्यासोबतच राहत होता. भूत आडवे आल्यामुळे १५ दिवसांपूर्वी अपघात झाला. त्यानंतर भुताशी मैत्री झाली. स्वर्ग पाहण्यासाठी हे भूत विनवण्या करीत होते, असेही त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. रविवारी रात्री सौरवचे आईवडील देवीच्या दर्शनाला गेले होते तर बहीण अभ्यास करीत होती. रात्री नऊ वाजता तो तणावातच वरच्या रूममध्ये गेला. अर्ध्या तासाने बहिणीने जेवण्यासाठी त्याला आवाज दिला. परंतु, त्याने जेवण्यास नकार दिला. त्यानंतर छताला ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.

अंधश्रद्धेने घेतला जीव
विज्ञानाच्या युगात आजही भूत, प्रेत, आत्मा यावर अनेकांचा विश्‍वास आहे. अभियंता होण्याचे स्वप्न बघणाऱ्या सौरवचाही यावर विश्‍वास होता. केवळ अंधश्रद्धेतून सौरवने आत्महत्या केली. एकुलत्या असलेल्या मुलाच्या अचानक निघून जाण्यामुळे आईवडिलांचा वृद्धपकाळातील सहारा गेल्याची खंत परिसरात होती.

Web Title: Due to going with the soul, life has ended superstition