गोंदियात दमदार पावसामुळे कोसळले घर; चारजण जखमी 

मुनेश्वर कुकडे
Friday, 28 August 2020

जिल्ह्यात आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या संततधार पावसामुळे गुरुवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्याला झोडपून काढले. सततच्या पावसामुळे नदी-नाले आणि तलाव ओसंडून वाहू लागले आहेत.

गोंदिया ः जिल्ह्यात गुरुवारी, २७ ऑगस्टच्या रात्रीपासून शुक्रवारपर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे घर पडून एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. २८) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शहरातील भीमनगर परिसरात असलेल्या राधाकृष्ण वॉर्डात घडली. सुभाष मेश्राम (वय ३९), आशा मेश्राम (वय ३५), आर्यन मेश्राम (वय १३) आणि लकी मेश्राम (वय १०) अशी जखमींची नावे आहेत. 

जिल्ह्यात आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या संततधार पावसामुळे गुरुवारी रात्री व शुक्रवारी जिल्ह्याला झोडपून काढले. सततच्या पावसामुळे नदी-नाले आणि तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट सुद्धा जारी केला.

शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतातील बांध्यांमध्ये पाणी साचल्याने धानपीकही बुडाले. या पाण्याला वाट मोकळी करून देण्यात प्रत्येक शेतकरी व्यस्त होता. 

अवश्य वाचा- गावगुंडाने पोलिसाला बदडल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो तेव्हा... 
 

सालेकसा तालुक्‍यातील बेवारटोला धरण, अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील नवेगावबांध जलाशय ओव्हरफ्लो झाले आहेत. या धरणांच्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

अवश्य वाचा- सुगरणीचा खोपा म्हणजे निसर्गातील उत्कृष्ट कामगिरीचा नमुनाच....
 

दरम्यान, या संततधार पावसात शुक्रवारी दुपारी भीमनगर राधाकृष्ण वॉर्डातील सुभाष मेश्राम यांचे घर कोसळले. यात त्यांच्यासह पत्नी व दोन मुले जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to heavy rain a house collapsed and four persons injured