कोरोनामुळे लग्न थांबल्याने वैतागला नवरदेव, झट नवरीच्या घरी गेला अन् तिला घेऊन आला!

अशोक काटकर 
Tuesday, 28 April 2020

शुक्रवारी सकाळीच नवरदेव योगेश लाभसेटवार भाऊ प्रीतम लाभसेटवार यांच्यासह दर्यापूरला गेला. सकाळी 11 वाजता नवरीच्या घरी पोहोचले. साडेअकरा वाजता सामाजिक अंतर राखत मोजक्‍या चार-पाच लोकांच्या उपस्थितीत लग्न आटोपले. त्यानंतर लगेच नवरदेव नवरीला घेऊन आपल्या गावी निघाला.

दारव्हा (जि. यवतमाळ) : येथील एका युवकाचे दर्यापूर (ता. अमरावती) येथील मुलीशी विवाह जुळला. लग्न दर्यापूर येथे 30 मार्चला ठरले होते. पत्रिका छापल्या. तयारी झाली, पण कोरोनाने वांदा केला. शेवटी परवानगी काढत नवरदेवच शुक्रवारी, 24 एप्रिल रोजी नवरीच्या घरी पोहोचला. नवरीच्या घरीच लग्न लावले अन्‌ नवरीला घेऊन घरी परतला. अखेर 30 मार्चचे लग्न 24 एप्रिलला आटोपल्याने दोन्हीकडच्या नातेवाइकांनी सुटकेचा श्वास सोडला. 

दारव्हा येथील अंबादेवी मंदिर परिसरात राहणाऱ्या योगेश प्रदीप लाभसेटवार यांचा दर्यापूर येथील राठीपुरा येथे राहणाऱ्या नीता कैलास तांडेकर हिच्याशी विवाह ठरला. लग्न 30 मार्च 2020 ला दर्यापूर येथे करण्याचे ठरले होते. दोन्हीकडे फेब्रुवारीपासून लगीनघाई सुरू झाली. नवरदेव-नवरीकडील मंडळींनी जोरदार तयारी सुरू केली. पत्रिका छापल्या अन्‌ वाटल्याही. लग्न आठ दिवसांवर येऊन ठेपले असतानाच कोरोनाने घात केला. 22 मार्चपासून सर्व देशासह राज्यातही लॉकडाउन सुरू झाले. डोळ्यांदेखत लग्नाची तारीख 30 मार्च निघून गेली. 14 एप्रिलला लॉकडाउन उघडेल या आशेवर वाट पाहणे सुरू केले. पण लॉकडाउन पुढे तीन मेपर्यंत लांबला. पुढे अजून काय होईल, याचा अंदाज येत नव्हता.

अवश्य वाचा- लॉकडाऊनमध्येही महिलांवर अत्याचार सुरूच; तक्रारी मात्र कमी

चार-पाच लोकांच्या उपस्थितीत आटोपले लग्न

शेवटी पालिकेचे माजी सभापती प्रकाश गोकुळे यांच्या सल्ल्याने 18 एप्रिलला पोलिस अधीक्षक यांच्याकडे लग्नाची रीतसर परवानगी मागितली. परवानगीनुसार गेल्या शुक्रवारी, 24 एप्रिलला दर्यापूर येथे लग्नाचा बेत ठरला. शुक्रवारी सकाळीच नवरदेव योगेश लाभसेटवार भाऊ प्रीतम लाभसेटवार यांच्यासह दर्यापूरला गेला. सकाळी 11 वाजता नवरीच्या घरी पोहोचले. साडेअकरा वाजता सामाजिक अंतर राखत मोजक्‍या चार-पाच लोकांच्या उपस्थितीत लग्न आटोपले. त्यानंतर लगेच नवरदेव नवरीला घेऊन आपल्या गावी निघाला. रात्री आठ वाजता नवरी-नवरदेव दोघेही घरी पोहोचले. घरच्यांना आनंद झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to lockdown marriage postpone. But Groom carried bride at his home