या महामार्गावरील धूळ उठली वाहनचालकांच्या जीवावर...अपघाताची शक्‍यता

तिरुपती चिट्याला
Sunday, 19 July 2020

सिरोंचा-आलापल्ली-चामोर्शी-गडचिरोली-वडसा-साकोली या मार्गाने दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोडले गेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते येथील चौपदरीकरणाचे उद्‌घाटन केले. मात्र, अनेक वर्षे लोटूनही या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : केंद्र आणि राज्य सरकारने दळणवळणाची सोय व्हावी आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी सिरोंचाजवळील गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांवर मोठे पूल बांधले आहेत. त्यामुळे दक्षिण आणि उत्तरेतील मोठ्या बाजारपेठांत जाणे सहजच शक्‍य झाले आहे. मात्र सिरोंचा- आलापल्ली - गडचिरोली या महामार्गावर जाणारी अवडज वाहने सतत धुरळा उडवत असल्याने इतर वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकदा अपघात होत असून नाका, तोंडात धूळ गेल्याने फुफ्फुसाचे व डोळ्यांचे आजार वाढले आहेत.

सिरोंचा-आलापल्ली-चामोर्शी-गडचिरोली-वडसा-साकोली या मार्गाने दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांना जोडले गेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते येथील चौपदरीकरणाचे उद्‌घाटन केले.

चौपदरीकरणाचे काम कासवगतीने

मात्र, अनेक वर्षे लोटूनही या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. सिरोंचा ते आलापल्ली या शंभर किमीच्या महामार्गावर अनेक खड्डे पडले होते. रस्ता खड्ड्यात लपल्याचे चित्र दिसत होते. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात होऊन मृत्यू आणि गंभीर जखमीही झाले होते. वाहनधारक नादुरुस्त रस्ते, अपूर्ण कामे, खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे त्रासले होते.

अपघात होण्याची शक्‍यता

आता सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखेच झाले आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दर्जाहीन साहित्य वापरून हे खड्डे बुजवत आहे. बुजवलेल्या खड्ड्यांतून जेव्हा जड वाहन जाते ते मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे इतर वाहनधारकांना समोर काहीच दिसत नाही. पूर्ण धूळ वाहनचालकांच्या डोळ्यात गेल्याने अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे.

जाणून घ्या : सावधान! दुचाकीवर यापुढे केवळ एकच व्यक्‍ती

वरिष्ठांचे दुर्लक्ष कायम

मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक त्रासले असूनही याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. उडणाऱ्या धुळीवर उपयोजना केली नाही, तर भविष्यात या धुळीमुळे वाहनचालकांना विविध प्रकारचे रोग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय धुळीमुळे अपघात घडून मृत्यूही होऊ शकतो. महामार्ग दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असला; तरी रस्त्याची अवस्था अशी का, असा प्रश्‍न वाहनचालक विचारत आहेत.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dust on this highway rose on the lives of motorists