मुख्यालयात ड्यूटी लावण्याचे ठरतात दर?

अनिल कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नागपूर ः पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांना घरूनच ऑनड्यूटी करण्यासाठी तसेच सोयीची ड्यूटी लावण्यासाठी चक्‍क प्रतिमाह पैसे घेतल्या जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला इमानदारीने काम करणारे कर्मचारी कंटाळले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ड्यूटीच्या बदल्यात पैसे गोळा करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे.

नागपूर ः पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांना घरूनच ऑनड्यूटी करण्यासाठी तसेच सोयीची ड्यूटी लावण्यासाठी चक्‍क प्रतिमाह पैसे घेतल्या जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला इमानदारीने काम करणारे कर्मचारी कंटाळले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ड्यूटीच्या बदल्यात पैसे गोळा करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे.
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयातील जवळपास 3200 कर्मचाऱ्यांना उपायुक्‍त दर्जाचे अधिकारी सोडून अन्य अधिकाऱ्यांच्या मनमानीचा सामना करावा लागत आहे. मुख्यालयातील "थ्री स्टार' अधिकाऱ्यांनी काही मोजके दलाल नेमले असून त्यांच्याकडून शहरात सोयीची ड्यूटी लावण्यासाठी किंवा गैरहजर असतानाही हजेरी लावण्यासाठी चक्‍क 500 ते 2000 रुपये महिन्याकाठी मोजावे लागत असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. साहेबांनी नेमून दिलेले एएसआय आणि हवालदार "महाजनक्‍या' करीत ड्यूटी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास त्याला मानसिक व शारीरिक खच्चीकरण करून त्रस्त केले जात असल्याची चर्चा आहे. मुख्यालयातील राखीव पोलिस कर्मचारी बॅंक ड्यूटी, ड्रील इन्स्ट्रक्‍टर, जस्टीस बंगला, पोलिस अधिकारी बंगला, मेस, शस्त्रागार, मैदान, विधानभवन, दीक्षाभूमी, कोराडी मंदिर, संघ मुख्यालय आणि अन्य ठिकाणी नियमित ड्यूटी लावण्यासाठी 500 रुपयांपासून पैसे घेतले जातात. यामध्ये साहेबांचा मोठा वाटा तर दलालांचीही चांगली कमाई होत आहे. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची चर्चा पोलिस मुख्यालयात आहे.
........
नियम बसवले धाब्यावर
मुख्यालयात पोलिस आयुक्‍त गजानन राजमाने यांनी व्यवस्थित सिस्टीम तयार केली होती. त्यानुसार दर तीन महिन्यांत गार्ड ड्यूटीवरील पोलिस कर्मचारी बदलले जात होते. मात्र, आता "थ्री स्टार' अधिकाऱ्याने थेट नियमांला तिलांजली देत वाट्टेल तेवढे दिवस गार्ड ड्यूटी देण्याचा फंडा सुरू केला. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

असे आहेत रेट्‌स

गार्ड ड्यूटी - 500
आजारी रजा - 1000
ऑनड्यूटी सुटी - 2000
स्टाफ ड्यूटी - 1000
शस्त्रागार - 2000
मेस ड्यूटी - 500
टपाल ड्यूटी - 500
दौरा कोर्ट - 500
बॅरिकेड मोबाईल - 1000

काही तक्रार असल्यास कर्मचाऱ्यांनी आम्हा अधिकाऱ्यांकडे करावी. तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास निश्‍चितच कारवाई करू. कर्मचाऱ्यांनी थेट माध्यमांकडे तक्रारी करण्यापेक्षा आमच्याकडे करावी. अन्यथा आम्ही तशा कर्मचाऱ्यांवरसुद्धा कारवाई करू.
- विक्रम साळी, पोलिस उपायुक्‍त, मुख्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Duty rates at headquarters?