esakal | दिवसा चटके, पहाटे थंडी; सोबतीला उद्यापासून वादळी पाऊसही    
sakal

बोलून बातमी शोधा

early morning cold, winter begins in Vidarbha

साधारणपणे ऑक्टोबर सुरू झाला की, वैदर्भींना हिवाळ्याची चाहूल लागते. गेल्या एक-दोन दिवसांपासून तो अनुभव येत असून, नवरात्रोत्सवापासून वातावरण पूर्णता कोरडे होऊन थंड वारे वाहायला लागतील,  असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.  

दिवसा चटके, पहाटे थंडी; सोबतीला उद्यापासून वादळी पाऊसही    

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर  : मॉन्सूनने विदर्भातून अद्याप अधिकृतरीत्या निरोप घेतला नसला तरी, हिवाळा मात्र सुरू झाला आहे. गेल्या एक-दोन दिवसांपासून दिवसा सौम्य चटके आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवायला लागली आहे. हे हिवाळ्याचे हे संकेत मानले जात आहेत. साधारणपणे ऑक्टोबर सुरू झाला की, वैदर्भींना हिवाळ्याची चाहूल लागते. गेल्या एक-दोन दिवसांपासून तो अनुभव येत असून, नवरात्रोत्सवापासून वातावरण पूर्णता कोरडे होऊन थंड वारे वाहायला लागतील,  असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.  

सध्या कमाल तापमान हळूहळू वाढू लागल्याने दिवसा सौम्य स्वरूपाचे चटके लागत आहेत. त्याचवेळी किमान तापमानात घसरण होऊ लागल्याने पहाटेच्या सुमारास थोडाफार गारवाही जाणवत आहे. थंडी वाढू लागल्याने शतपावली करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारपासून विदर्भात वादळी पावसाचीही शक्यता वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात विकेंडपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची दाट शक्यता आहे.

अधिक वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा
 

विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मॉन्सूनने यंदाही विदर्भावर मेहरबानी केली आहे. मॉन्सूनने दमदार हजेरी लावत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज शंभर टक्के खरा ठरविला. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ९४३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ८५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जो सरासरीइतका पाऊस मानला जात आहे.

विदर्भात अकोला (- २७ टक्के), यवतमाळ (-२४ टक्के), अमरावती (-२० टक्के) आणि चंद्रपूर (-१८ टक्के) हे चार जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली. सर्वाधिक १६ टक्के पाऊस वाशीममध्ये झाला. नागपूर जिल्ह्यातही पावसाने सरासरी गाठली. २०१५ पासूनचा इतिहास बघितल्यास यंदा तिसऱ्यांदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१५ मध्ये ८४८ मिलिमीटर, २०१६ मध्ये १०४४ मिलिमीटर, २०१७ मध्ये ७३१ मिलिमीटर, २०१८ मध्ये ८७५ मिलिमीटर आणि गतवर्षी सर्वाधिक १०५४ पावसाची नोंद करण्यात आली. 

मागील चार महिन्यांत नागपुरात सर्वाधिक पाऊस (४०७ मिलिमीटर) जुलै महिन्यात कोसळला. तर गोंदियामध्ये ७०९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दमदार पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून, विदर्भातील तलावही काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षात जास्त पाऊस

भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाजही तंतोतंत खरा ठरला. लागोपाठ दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. देशात यावर्षी १०९ टक्के पाऊस पडला. १९५८ नंतर सलग दोन वर्षे अधिक पाऊस पडण्याची गेल्या ६२ वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९५८ मध्ये ११० टक्के व त्यानंतरच्या वर्षी ११४ टक्के पावसाची नोंद झाली होती. 

संपादन  : अतुल मांगे