ट्रक-जीप धडकेत आठ ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

ट्रक-जीप धडकेत आठ ठार

अंबाजोगाई : ट्रक - जीपच्या (क्रुझर) धडकेत आठ जण ठार झाले तर अन्य अकराजण जखमी झाल्याची घटना लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील नंदगोपाल डेअरीनजीक शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. मृतांमध्ये सहा महिला, पुरुषासह एका मुलाचा बालकाचा समावेश आहे.

मृत व जखमी लातूर जिल्ह्यातील आहेत. अपघातात निर्मला सोमवंशी (वय ३८), स्वाती बोडके (३५), शकुंतला सोमवंशी (३८, रा. आर्वी) सरोजबाई कदम (३७, रा. मळवटी) चित्रा शिंदे (३५, कासारखेडा) खंडू रोहिले (३०, जीप चालक, लातूर) आणि नऊ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. कमल जाधव (३०) यांचा लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे बर्दापूरचे पोलिस निरीक्षक खरात यांनी सांगितले.जखमींवर येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राडी (ता.अंबाजोगाई) येथील उत्तमराव गंगणे यांच्याकडे धार्मिक कार्यक्रम होता. त्यासाठी आर्वी व साई (जि. लातूर) येथून त्यांचे नातेवाईक जीपने निघाले होते. बर्दापूरजवळ नंदगोपाल डेअरीजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जीपला धडक दिली. परिसरातील नागरिक व पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पाठविले.

अरुंद रस्त्याचे बळी

लातूर- अंबाजोगाई मार्ग बर्दापूरपर्यंत चौपदरी असून पुढे अरुंद आहे. मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर नेहमीच अपघातात होतात. अनेकदा मागणी करूनही अरुंद रस्त्याचा प्रश्न मार्गी निघत नसल्याचे नागरिक सांगतात.

अंबाजोगाईजवळ अपघातात काहींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना दुःखद आहे. जखमींना वैद्यकीय मदत, योग्य उपचारासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. दुर्घटनेत मृत झालेल्यांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.

-धनंजय मुंडे, पालकमंत्री, बीड

बुलडाणा जिल्ह्यात बसची कारला धडक

मेहकर : ‘सैनी ट्रॅव्हल्स’ची बस व कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत कारमधील पाचपैकी तिघांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खामखेड फाट्यानजीक शनिवारी (ता. २३ ) पहाटे घडली. मृत हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील असल्याचे दुपारी स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चाळीसगाव येथील योगेश विनायक विसपुते (वय ३५), विलास विनायक विसपुते (वय ३२), इंदल चव्हाण (वय ३८) यांचा समावेश आहे.

तर, मिथुन रमेश चव्हाण व ज्ञानेश्‍वर रंगनाथ चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम येथील उपजिल्हा रुग्णालय व नंतर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. सैनी ट्रॅव्हल्सची बस औरंगाबाद येथून नागपूरकडे भरधाव वेगाने जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या अल्टो कारला बसने जोरदार धडक दिली. यात कारच्या समोरील भागाचा पूर्णतः चुराडा झाला. याप्रकरणी खासगी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साखरपुड्यासाठी जाताना काळाची झडप

अपघातात मृत्यू झालेला योगेश विनायक विसपुते याचा विवाह १८ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे ठरला होता. त्या कामानिमित्त तो मित्र आणि नातेवाइकांसोबत लग्न आणि साखरपुड्यासाठी जात असताना मेहकरनजीक त्याच्यावर काळाने झडप घातली.

Web Title: Eight Killed Truck Jeep Collision Accident Near Ambajogai Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top