esakal | दारव्ह्याच्या माजी नगराध्यक्षासह आठ जणांना अटक; 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

रविवारी सकाळी मृताचे नमुने घेण्यासाठी सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्याकरिता वैद्यकीय पथक गेले होते. त्यावेळी मृतदेह नेण्यास विरोध करण्यात आला. शेवटी अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत घालून कब्रस्तानमधून मृतदेह ताब्यात घेतला.

दारव्ह्याच्या माजी नगराध्यक्षासह आठ जणांना अटक; 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी व या भागातील सुविधांबाबतच्या तक्रारीवरून गैरकायद्याची मंडळी जमवून अधिकारी व पोलिसांशी वाद घालत दगडफेक करण्यात आली. ही घटना रविवारी (ता.14) दुपारी साडेतीनच्या सुमारास दारव्हा शहरात घडली. याप्रकरणी माजी नगराध्यक्षासह आठ जणांना अटक करण्यात आली असून 70 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

तहसीलदार तथा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी सय्यद फारुख यांच्यासह अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील एक महिला कोरोनाबाधित निघाल्याने या भागात प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले. शनिवारी (ता.13) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी मृताचे नमुने घेण्यासाठी सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्याकरिता वैद्यकीय पथक गेले होते. त्यावेळी मृतदेह नेण्यास विरोध करण्यात आला. शेवटी अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत घालून कब्रस्तानमधून मृतदेह ताब्यात घेतला.

त्यानंतर याच प्रभागात प्रतिबंधित क्षेत्रातील काही नागरिक गोळा झाल्याची महिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून तहसीलदार संजय जाधव, ठाणेदार मनोज केदारे, मुख्याधिकारी धीरज गोहाड तेथे पोहोचले. तेव्हा सय्यद फारुख यांच्यासह शंभर ते सव्वाशे गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना त्या ठिकाणी घेऊन आले. मृतदेह ताब्यात देण्यावरून अधिकाऱ्यांशी वाद घातला. प्रभागात सुविधा पुरविल्या जात नाहीत, अशी तक्रार करीत शिवीगाळ करण्यात आली आणि अचानक दगडफेक सुरू झाली. यामध्ये शासकीय वाहनांचे नुकसान झाले. याशिवाय तहसीलदारांच्या चालकांच्या डोक्‍याला दुखापत झाली, अशी फिर्याद तहसीलदारांनी पोलिसात दिली. त्यावरून 70 जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात येऊन माजी नगराध्यक्ष सय्यद फारूख यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. 

अवश्य वाचा- व्वा क्या बात है! खासदार नवनीत राणांनी केली चक्क शेतात पेरणी...

पोलिस अधीक्षकांची भेट 

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दारव्हा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. याशिवाय घडल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दारव्हा शहरात तगडा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.