नेता असावा तर असा! घेराव घालणाऱ्या शेतकऱ्यांना क्षणात केले शांत; पहा व्हिडिओ

Eknath Shinde calmed down the besieging farmers political news
Eknath Shinde calmed down the besieging farmers political news

गडचिरोली : दोन दिवसांच्या भरगच्च दौऱ्यावर दाखल झालेले राज्याचे नगरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने घेराव टाकला. परंतु, शिंदे स्वतः चालत आले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे आक्रमक झालेले शेतकरी क्षणात शांत झाले. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न समजावून घेतले आणि तिढा सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

शनिवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत  जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजिण्यात आली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे बैठकीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल होत असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या समस्या पालकमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले.

स्वतः आमदार होळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी आंदोलकांना भेटावे, अशी गळ घातली. पालकमंत्री  शिंदे यांनी नियमित कामकाज बाजूला ठेवत लगेच आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याची किमान २० क्विंटल धानाची खरेदी करावी, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

धान खरेदीतील किचकट प्रक्रिया दूर करण्याचा रेटा लावत ऑनलाइन नोंदणीसाठी वनहक्क पट्टेधारक शेतकरी- अतिक्रमित जागेवरील शेतकरी यांना समाविष्ट करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. शिंदे यांनी विषय समजून घेत तिढा सोडविण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः चालत येत शेतकरी संवाद साधल्याने आक्रमक शेतकरी शांत झाले आणि त्यांच्या कृतीवर समाधान व्यक्त केले.

फक्त ३० टक्के धानाचीच खरेदी

वनहक्क पटेधारकांच्या शेतांतील एकरी २० क्विंटल धान खरेदी केले पाहिजे. महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन पोर्टलमध्ये अजूनही खरेदी सुरू केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिढ्यान पिढ्या अतिक्रमण केले आहे, त्या शेतकऱ्यांचेदेखील धान सरकारने खरेदी करावे. कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा सेवा सहकारी सोसायटी असो धान खरेदीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ठ आहे.

आतापर्यंत केवळ ३० टक्केच धान खरेदी करण्यात आले आहे. अजून ७० टक्के धानाला खरेदीची प्रतीक्षा आहे. व्यापाऱ्यांचीच खरेदी फक्त सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पालकमंत्र्यांना घेराव केला. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या, अशी विनंती आम्ही पालकमंत्र्यांना केली असल्याचे आमदार डॉ. होळी म्हणाले.

आंदोलकांची नारेबाजी

महाविकासआघाडी सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी झालीच पाहिजे, अशी नारेबाजी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केली. परंतु, पालकमंत्री शिंदे चालत आले आणि शेतकऱ्यांशी बोलले. त्यानंतर आमदार डॉ. होळी यांनी यासाठी त्यांना धन्यवाद दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com