प्रचारतोफा थंडावल्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

नागपूर : शहराच्या विविध भागांतून सर्वच राजकीय तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रॅली, पदयात्रा काढत मतदारसंघ पिंजून काढला. कार्यकर्त्यांच्या घोषणा, नेते, उमेदवारांच्या आवाहनामुळे प्रमुख मार्गांना सभास्थळाचे रूप आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॉंग्रेस, भाजप, बसप, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही आज मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी घाम गाळला. 

नागपूर : शहराच्या विविध भागांतून सर्वच राजकीय तसेच अपक्ष उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रॅली, पदयात्रा काढत मतदारसंघ पिंजून काढला. कार्यकर्त्यांच्या घोषणा, नेते, उमेदवारांच्या आवाहनामुळे प्रमुख मार्गांना सभास्थळाचे रूप आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॉंग्रेस, भाजप, बसप, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही आज मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी घाम गाळला. 
राज्य विधानसभेसाठी सोमवारी मतदान होणार आहे. आज शेवटच्या दिवशी शहरातील सहाही मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच उमेदवारांनी मतदारांना मतांचा जोगवा मागितला. उमेदवारांनी पदयात्रा, बाइक रॅली काढून धावता प्रचार केला. शेवटच्या दिवसभरात मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे गट तयार करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. उमेदवारांनी प्रमुख मार्गावर रॅलीद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो झाला. माटे चौकापासून तीन किमीपर्यंत रोड शोद्वारे त्यांनी मतदारांसोबत संवादही साधला. कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांनीही बाइक रॅलीद्वारे विविध मार्गांनी भ्रमण केले. पश्‍चिम नागपुरात भाजपचे सुधाकर देशमुख यांनी बाइक रॅली काढली. तर, कॉंग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी पदयात्रेद्वारे मतदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दक्षिण नागपुरात भाजपचे मोहन मते, कॉंग्रेसचे गिरीश पांडव, अपक्ष सतीश होले यांनी रॅली काढली. बसपचे शंकर थूल यांनी पदयात्रेवर भर दिला. उत्तर नागपुरात भाजपचे डॉ. मिलिंद माने, कॉंग्रेसचे डॉ. नितीन राऊत, बसपचे सुरेश साखरे यांनीही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पूर्व नागपुरात भाजपचे कृष्णा खोपडे, कॉंग्रेसचे पुरुषोत्तम हजारे, मध्य नागपुरात भाजपचे विकास कुंभारे, कॉंग्रेसचे बंटी शेळके यांनीही रॅली काढून मतदारसंघात नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आज दिवसभर शहरातील प्रमुख मार्गावर रॅली, पदयात्रांमुळे अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली. उमेदवारांनी रस्त्यांनी फिरताना मतदानाचे आवाहन केले. वेगवेगळ्या पक्षांच्या रॅलीत कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या. अपक्ष उमेदवारांचेही कार्यकर्ते जोमात दिसून आले. त्यांनीही घोषणाबाजी केली. सायंकाळी प्रचार संपुष्टात येताच सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांवरील पक्षाचे झेंडे, बॅनर आदी काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे दमलेल्या कार्यकर्त्यांत जोश भरण्यासाठी सर्वच उमेदवारांना विविध हॉटेल्समध्ये त्यांच्या नाश्‍ता-चहाची सोय केली होती. त्यामुळे दुपारी अनेक रेस्टॉरंटमध्ये गर्दी दिसून आली. सकाळी पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी कार्यकर्त्यांच्या रांगा होत्या. काही कार्यकर्त्यांनी येथेही घोषणा केल्याने पेट्रोल पंप परिसरही दणाणला. 
गुप्त बैठकांवर जोर 
प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांनी रात्रीपासूनच गुप्त बैठकांवर जोर दिला. उमेदवारांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह रात्री विविध भागांतील घरांमध्ये, अपार्टमेंटमध्ये गुप्त बैठकीसाठी नियोजन केले होते. उद्या दिवसभरही विविध ठिकाणी गुप्त बैठकांचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले आहे. 
कार्यकर्त्यांना रसद पुरविण्याची कसरत 
मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना विविध आमिषे देण्याची परंपरा आहे. यात दारूपासून विविध साहित्यही मतदारांना दिले जातात. मात्र, अशा उमेदवार किंवा कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर असते. त्यामुळे पैसे, दारू आदी रसद कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांची कसोटी लागणार आहे. 
हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई 
विविध बाइक रॅलीदरम्यान सर्वच कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केले. अनेक रॅलीमध्ये दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय दिसून आले. या सर्वांवर कारवाई होणार आहे. 400 कार्यकर्त्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election campaign