पदयात्रा, रॅलीने उडणार प्रचाराचा धुराळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नागपूर : विविध राजकीय पक्षांसोबतच अपक्षांनीही उद्या, शनिवारी पदयात्रा, दुचाकी रॅली आदीची तयारी चालविली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराचा धुराळा उडणार आहे. उमेदवारांनी आजच कार्यकर्त्यांची फौज तयार केली असून रॅली, पदयात्रेचे नियोजन पूर्ण केले. शहराच्या कानाकोपऱ्यात पदयात्रा, दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याने अनेक रस्ते जाम होण्याचीही शक्‍यता आहे. 

नागपूर : विविध राजकीय पक्षांसोबतच अपक्षांनीही उद्या, शनिवारी पदयात्रा, दुचाकी रॅली आदीची तयारी चालविली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराचा धुराळा उडणार आहे. उमेदवारांनी आजच कार्यकर्त्यांची फौज तयार केली असून रॅली, पदयात्रेचे नियोजन पूर्ण केले. शहराच्या कानाकोपऱ्यात पदयात्रा, दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याने अनेक रस्ते जाम होण्याचीही शक्‍यता आहे. 
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (21 ऑक्‍टोबर) मतदान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार उद्या सायंकाळी संपुष्टात येणार आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिसून असून मतदारसंघातील मोठा भाग पिंजून काढण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत अपक्ष उमेदवारांनी दुचाकी रॅलीवर भर दिला आहे. आज उशिरा रात्रीपर्यंत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते दुचाकी रॅलीचा मार्ग निश्‍चित करताना आढळून आले. उमेदवारासाठी खुली जीप ठरविण्यात आली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी पदयात्रेसाठीही नियोजन केले. काहींनी उमेदवार नसला तरी स्वतः पदयात्रा काढण्याची तयारी चालविली आहे. कार्यकर्त्यांसाठी नाश्‍ता, चहाची सुविधाही काही उमेदवारांनी केली आहे. एकाचवेळी पेट्रोल पंपावर गर्दी होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी आज रात्रीच दुचाकीत पेट्रोल भरून ठेवले. शहरातील दक्षिण-पश्‍चिम, दक्षिण, पूर्व, मध्य, उत्तर व पश्‍चिम नागपूर मतदारसंघात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवरून दुचाकी रॅली निघणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उद्या वाहतूक पोलिसांचाही कस लागणार आहे. दुचाकीवर झेंडे आदी घेऊन घोषणाचा पाऊस पाडत कार्यकर्ते रॅली काढणार असल्याने शहराचा विविध भाग दणाणणार आहे. 
हेल्मेट घालूनच या 
उद्या दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. मात्र, या रॅलीत येताना दुचाकीधारकांनी हेल्मेट घालूनच यावे, असे आवाहन विविध भागांतील प्रचारप्रमुखांनी केले आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालविताना पोलिसांचा अडथळा नको, म्हणून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी हेल्मेटबाबत खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. 
पावसामुळे उमेदवारांची निराशा 
आज सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विविध उमेदवारांनी सायंकाळी निश्‍चित केलेल्या सभा रद्द करण्यात आल्या तर काही भागात सभेची वेळ पुढे ढकलण्यात आली. पावसामुळे दिवसाला होणारी सभा रात्री घेण्यात आली. त्यामुळे लाइट आदीचा अतिरिक्त खर्चाचा ताण उमेदवारांवर पडला. 
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election campaign ends today