esakal | सिंदी नगराध्यक्षांच्या खुर्चीवर तुमाने की पाटील? १५ फेब्रुवारीला होणार निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

by election for sindi mayor in wardha

विशेष म्हणजे नगराध्यक्षापद हे अनुसूचित जाती (महीला)  राखीव असल्याने विद्यमान नगरसेवकांपैकी भाजपाच्या बबीता तुमाने आणि राष्ट्रवादीच्या सुमन पाटील या दोन नगरसेविका उमेदवारी दाखल करण्यास पात्र आहेत.

सिंदी नगराध्यक्षांच्या खुर्चीवर तुमाने की पाटील? १५ फेब्रुवारीला होणार निवडणूक

sakal_logo
By
मोहन सुरकार

सिंदी रेल्वे (जि. नागपूर) : येथील नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा संगीता सुनील शेंडे यांना पुन्हा दुसर्‍यांदा नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशानुसार बुधवारी पदमुक्त करण्यात आले. नगराध्यक्ष निवडीचा शासकीय कार्यक्रम जाहीर झाला असून नव्या नगराध्यक्षाची निवड सोमवारी (ता. १५)ला करण्याचे आदेशानुसार ठरविण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे नगराध्यक्षापद हे अनुसूचित जाती (महीला)  राखीव असल्याने विद्यमान नगरसेवकांपैकी भाजपाच्या बबीता तुमाने आणि राष्ट्रवादीच्या सुमन पाटील या दोन नगरसेविका उमेदवारी दाखल करण्यास पात्र आहेत. आता नगराध्यक्षापदाची माळ तुमाने की पाटील यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे सिंदीवासीयांचे लक्ष लागले आहे. स्थानिक नगरपालीकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून संगीता सुनील शेंडे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. सोबतच भाजपा ८, काँग्रेस ६, राष्ट्रवादी २ आणि अपक्ष १ अशी पक्षीय स्थिती होती. मतदार संघाचे आमदार तथा भाजपाचे नेते समीर कुणावार यांनी स्थानिक तडजोडीनुसार आणि लोकभावनेचा आदर करीत काँग्रेसचे गटनेता आशिष देवतळे यांच्या गटाच्या चार नगरसेवक आणि एका अपक्षाला सत्तेत सहभागी करत सिंदी नगरपालिकेत २०१६ ला सत्ता स्थापन केली. मात्र, काही महीन्यातच नगराध्यक्षा शेंडे आणि सत्तेतील सहभागी काँग्रेसचे आणि भाजपच्या नगरसेवक यांच्यात 'तू-तू-मैं-मै'ने सुरुवात झाली आणि नेहमी खटके उडू लागले. परिणामी पालिकेच्या कारभारात एकवाक्यता आणि सुसंगतेचा अभाव जाणवू लागला.

हेही वाचा - Big Breaking : वर्ध्यातील उत्तम गाल्व्हा कंपनीत भीषण स्फोट, 38 जण गंभीर जखमी; कठोर कारवाईचे...

नगराध्यक्षा एकतर्फी कारभार करतात अशी ओरड होऊ लागली. हा वाद विकोपाला जाण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाच्या नगराध्यक्षांचा निर्णय कारणीभूत ठरला. यानंतर पालिकेतील १७ नगरसेवकापैकी १४ नगरसेवकांनी एकसाथ नगराध्यक्षावर अविश्वास व्यक्त करीत २३ डिसेंबर २०१९ ला जिल्हाधिकारी यांच्याकडे अध्यक्षांना पदावरून पायउतार करण्याचा प्रस्ताव दाखल केला.  जिल्हाधिकारी साहेबांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत आपला अहवाल मंत्रालयात पाठवीला. मात्र, कोविड काळामुळे निर्णय येण्यास फार उशीर लागला. तत्पूर्वी स्थानिक चंद्रशेखर बेलखोडे यांनी नगराध्यक्षांनी निवडणुकीदरम्यान शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे नगरपालिका अधिनियम १९६५ नुसार त्यांना पायउतार करण्यात यावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली.  यावर सुद्धा उभयपक्षाचे म्हणने ऐकून घेत आणि स्थानिक मुख्याधिकारी अहवालानुसार १८ जानेवारी २०२१ ला नगराध्यक्षा संगीता शेंडे यांना पदावरुन पायउतार केले.  याविरुद्ध नगराध्यक्षा शेंडे यांनी ५ जानेवारी २०२१ ला मंत्रालयातून स्थगनादेश प्राप्त करीत ६जानेवारीला पुन्हा पदभार स्विकारला. मात्र, केवळ २१ दिवसातच म्हणजे २७ जानेवारी २०२१ ला नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अविश्वास प्रस्तावावर नगरपंचायत, नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ४५ अ आणि ब अन्वये निर्णय देत नगराध्यक्ष संगीता शेंडे यांना पदमुक्त केले. शिवाय पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवू न शकण्याची बंदी सुद्धा घातली. कदाचित सिंदीच्या इतिहासातील ही एकाच अध्यक्षांना दोनदा पायउतार होण्याची पहिली घटना असावी. 

हेही वाचा - शटडाऊनच्या तयारीत असताना मशीनमधून निघाली गरम वाफ, पार्टीकल बाहेर येताच माजला हाहाकार

पालिकेच्या या पंचवार्षिक कार्यकाळातील उर्वरित काळासाठी नगराध्यक्षाचा पदभार स्विकारण्यासाठी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी १ फेब्रुवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रमनुसार नगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांतून नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, नामनिर्देशन अर्ज मागे घेणे याबाबत नमूद करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीला पीठासीन अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्धा उपविभागीय अधिकारी बगळे यांच्या उपस्थितीत नवीन नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. 

विशेष म्हणजे नगराध्यक्षपद आरक्षीत असून अनुसूचित जाती महीला प्रवर्गासाठी आरक्षीत आहे. पालिकेतील नगरसेवकांत दोनच महीला अनुसूचित जाती प्रवर्गातील आहे. यात भाजपाच्या बबीता प्रभाकर तुमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूमन सोपान पाटील यांच्यापैकीच एकाची वर्णी लागणार आहे. पालिकेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाकडे सर्वात अधिक ९ नगरसेवक संख्या तर काँग्रेसकडे ६ नगरसेवक संख्या आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ दोनच नगरसेवक आहे. शिवाय काँग्रेसचा मोठा गट म्हणजे आशिष देवतळे गट चार नगरसेवक घेऊन अगोदरच भाजपासोबत सत्तेत सहभागी असल्याने भाजपाकडे संख्याबळ मोठे आहे. परिणामी नगराध्यक्षपदी भाजपच्या बबीता प्रभाकर तुमाने यांची वर्णी लागण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. मात्र, राजकारणात कधीही काहीही घडू शकते. राजकारणाच्या सारीपाठावर असंभव असे काहीच नाही.

loading image