esakal | कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनेगाव डिफेन्स (जि.नागपूर) : आयुधनिर्माणी अंबाझरीत कार्यरत कर्मचारी सुमित संतराम सूर्यवंशी (वय 32) यांना कूलरचा शॉक लागून ते जागीच ठार झाले.
मिळालेल्या महितीनुसार सुमित सूर्यवंशी पत्नीसोबत डिफेन्स वसाहतीतील क्वॉ.क्र.9/90/2 मध्ये निवास करीत होते. तीन वर्षांपूर्वी ते आयुधनिर्माणी अंबाझरीतील कारखान्यात इलेक्‍ट्रिक विभागात रुजू झाले होते. मागील आठवड्यात त्यांची पत्नी माहेरी गेली होती. सुमित हे घरी एकटेच होते. मध्यंतरी गरमी वाढली असल्याने 1 सप्टेंबरला ते घरी एकटेच असताना त्यांनी कुलर सुरू केला. कुलरमध्ये काहीतरी बिघाड असेल असे समजून तो दुरुस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुलरमधून निघणाऱ्या वायरला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार झटका बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या पत्नीने अनेकदा फोनवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो होत नसल्याने तिने शेजारच्या ओळखीच्या महिलेला फोन करून घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले. शेजारची महिला त्यांच्या घरी गेली तेव्हा घराचे दार आतून बंद होते. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तिने शेजाऱ्यांना बोलाविले. मृताच्या पत्नीलाही फोनवरून घटनेची माहिती कळविली. मृताचे मित्र व अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तीन दिवसांपासून मृतदेह आत कुजलेल्या अवस्थेत आढळला. डिफेन्सच्या सुरक्षा विभागाने वाडी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. वाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील इस्पितळात रवाना करण्यात आला. वाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top