जिथे राबती हात तेथे हरी! तब्बल हजारावर महिलांना मिळाला रोजगार

श्रीकांत पेशट्टीवार
Thursday, 24 September 2020

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सात तालुक्‍यात ‘टेलरिंग युनिट’ ची स्थापना करण्यात आली. या सात युनिटमधून एक हजार ७०८ महिलांना शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

चंद्रपूर : जेव्हा लोकांच्या हाताला काम नव्हते, तेव्हा अत्यंत आर्थिक संकटाच्या काळात महिलांना काम पुरविण्याचे कार्य एका संस्थेने केले. टाळेबंदीत लघू व्यवसायांना घरघर लागली. हातचे काम गेले. नवे काम मिळेना, अशी अवस्था सर्वसामान्यांची झाली आहे. अशा आर्थिक संकटात महिला आर्थिक विकास महामंडळाने मदतीचा हात पुढे केला. जिल्ह्यात महामंडळाने सुरू केलेल्या सात टेलरींग युनिटच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार सातशे महिलांना रोजगार मिळाला. या युनिटमधून लॉकडाऊनकाळापासून आत्तापर्यंत जवळपास तीस हजारांहून अधिक मास्कची निर्मिती झाली. यातून महिलांना बऱ्यापैकी मिळकत झाली.

कोरोना विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी सरकारने मार्च महिन्यात देशात टाळेबंदी केली. या टाळेबंदीने अनेक उद्योगांचे कंबरडे मोडले. लघू व्यवसाय डबघाईस आलेत. या परिस्थितीत अनेकांनी आपल्या व्यवसायांचे मार्ग बदलविले. देशावर आर्थिक संकट कोसळले. तसे सर्वसामान्यांनाही आर्थिक संकटाची झळ बसली. या गंभीर स्थितीचा सर्वाधिक फटका हातावर आणून पानावर खाणाऱ्या सर्वसामान्यांना बसला. व्यवसाय ठप्प. त्यात हाताला काम नाही. अशात कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावू लागला. या बिकट स्थितीत महिला विकास महामंडळाने मदतीचा हात पुढे केला. रिकाम्या हातांना काम मिळाले.

महिलांचा आर्थिक विकास उंचाविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सातत्याने प्रयत्न करीत असते. बचतगट, लघू व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. टाळेबंदीत उद्‌भवलेल्या संकटात मंडळाने महिलांना रोजगार दिला.

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सात तालुक्‍यात ‘टेलरिंग युनिट’ ची स्थापना करण्यात आली. या सात युनिटमधून एक हजार ७०८ महिलांना शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याद्वारे महिलांना शिवण कामाचे ऑर्डर मिळत होते. या उद्योगातून मिळणाऱ्या मिळकतीवर अनेकांची उपजीविका चालायची. मात्र, टाळेबंदीत टेलरिंग युनिट बंद पडले. रोजगार गेला. या स्थितीत माविम आणि प्रशासनाने पुढाकार घेत आपल्या स्तरावर टेलरिंग युनिट सुरू केले.

कोरोनाच्या प्रादुर्भावात मास्कची मोठी मागणी वाढली. त्यामुळे शिवणकाम करणाऱ्या महिलांना मास्क शिवण्याचे काम देण्यात आले. सोबतच कापडी पिशवी शिवण्याचे कामही मिळाले. या कामात जिल्ह्यातील १ हजार ७०८ महिला कार्यरत होत्या. टाळेबंदीच्या काळात जवळपास तीस हजारांहून अधिक मास्कची निर्मिती टेलरिंग युनिटमधून करण्यात आली. टेलरिंग युनिटने टाळेबंदीत हजारो महिलांना रोजगार दिला.

सविस्तर वाचा - फसवणुक! जेमतेम सातवी पास आणि करतात डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार

सामाजिक बांधिलकी
आर्थिक संकट कोसळले असतांनाही टेलरिंग युनिटच्या महिलांनी सामाजिक दायित्व जोपासले. तळागाळातील गरीब महिलांना मोफत मास्क दिले. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, नगरपंचायतींनाही माफक दरात मास्कचा पुरवठा केला. टेलरींग युनिटच्या माध्यमातून महिलांना जीवन जगण्याची एक दिशा मिळाली, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा अधिकारी नरेश उगेमुगे यांनी दिली.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment to women in Chandrapur district