गडचिरोलीच्या तलावाला अतिक्रमणाचा विळखा, घाणीचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

गडचिरोली शहरात भव्य तलाव आहे. मात्र, या तलावाची दुर्दशा सुरू असून, अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. घाणीचे साम्राज्य आहे. काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. पण, काही दिवसांतच ते बंद पडले.

गडचिरोली : मोठ्या संख्येने तलाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयात अर्थात गडचिरोली शहरात भव्य तलाव आहे. मात्र, या तलावाची दुर्दशा सुरू असून, अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. घाणीचे साम्राज्य आहे. काही वर्षांपूर्वी या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. पण, काही दिवसांतच ते बंद पडले. तेव्हापासून या तलावाला सौंदर्यीकरणाची प्रतीक्षा आहे.

गडचिरोली शहरात गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर डाव्या बाजूला भव्य तलाव आहे. हा तलाव अतिशय विस्तीर्ण असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. पण, या महत्त्वाच्या तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे कधीच लक्ष देण्यात आले नाही. फक्त गणेशविसर्जनाच्या दिवसांत येथील घाटाची थोडी डागडुजी व पाळीची दुरुस्ती करण्यात येते. खरेतर या तलावाची नीट देखभाल व सौंदर्यीकरण झाल्यास नागरिकांना विरंगुळ्यासोबतच एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून या जागेचा विकास करता येऊ शकतो.

अनेकांनी केले अतिक्रमण

काही वर्षांपूर्वी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते. चंद्रपुरातील रामाळा तलावाच्या धर्तीवर येथे सौंदर्यीकरण करून बागेच्या निर्मितीलाही सुरुवात झाली होती. पण, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक. अचानक हे काम बंद करण्यात आले. कामगार, कंत्राटदाराने गाशा गुंडाळला. तेव्हापासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय कधीच पटलावर आला नाही. या तलावाच्या एका भागाला गोकुळनगर असून, त्या बाजूने या तलावावर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्या घरांवरही अद्याप कारवाई झाली नाही. शहरात अनेकदा अतिक्रमण हटाव मोहिमा काढण्यात येतात. पण, या अतिक्रमणधारकांवर कोणतीच कारवाई होत नाही.

सांडपाणी जाते तलावात

शिवाय शहरातील अनेक नाल्यांचे घाण पाणी व घरांतील सांडपाणी याच तलावात जाते. त्यामुळे तलावातील पाणी दूषित होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. त्यामुळे या तलावाचे सौंदर्यीकरण करून येथे बोटिगची व्यवस्था करत एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : भंडारा येथील महानुभाव पंथाच्या तीर्थस्थळांचे रूप पालटले...मध्य भारतातील भाविकांची हजेरी

पार्किंगचीही दुर्दशा

या तलावाचे सौंदर्यीकरण सुरू असताना येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी भव्य पार्किंग तयार करण्यात आली. कोरोनाच्या सावटापूर्वी दर रविवारी कारगिल चौक परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारातील ग्राहकांच्या वाहनांची सोय इथेच करण्यात आली होती. पण, या पार्किंगचीही दुर्दशा होत असून अनेक नागरिक या जागेचा उपयोग उघड्यावर शौचासाठी करतात. याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment on Gadchiroli lake