esakal | चहावाला अभियंता
sakal

बोलून बातमी शोधा

हेमंत शिवहरे

चहावाला अभियंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले. नोकरीत तुटपुंजा पगार... चरितार्थ चालविणे कठीण, हे लक्षात आल्यावर नवीन करण्याच्या उद्देशाने नोकरीला रामराम करत स्वतःचा व्यवसाय आयटीपार्कजवळ थाटला. आता 65 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे चहा तो बनवितो. या चहाच्या चवीने विदेशी लोकांनाही भुरळ पडली आहे.
निवडणुकीच्या काळात चाय पे चर्चा चांगलीच रंगली. आता मंदीचे वारे वाहू लागले. कमाई करणारे हात बेरोजगार होऊ लागले. उच्च शिक्षित युवकांवर नोकऱ्या गमवण्याची पाळी आली. हे ऐकल्यावर आईवडिलांचे डोळे पाणावतात... पण काय करणार ? परिस्थितीसोबत संघर्ष करणे हीच खरी युवाशक्ती. असेच येथील उच्च शिक्षित तीन युवक हेमंत शिवहरे, अविनाश कुमार आणि अरमान शिवहरे यांनी परसोडी आयटी पार्क परिसरात "टीव्हॅल्यूशन' नावाने चार चाकी वाहनावरच चहाचे दुकान थाटून नवा आदर्श निर्माण केला. "जान है तो जहान है' या म्हणीप्रमाणे नवी दिशा, ऊर्जा आणि नवचैतन्यही निर्माण केले. त्यांची यश कथा युवकांना खरच प्रेरणा देणारी आहे.
याबाबत बोलताना हेमंत शिवहरे म्हणाला, कमी पैशात सुरू होणारा हा व्यवसाय. तरी त्यात सातत्याने गुणवत्ता टिकवून ठेवावी लागते. हा रोजचाच संघर्ष असतो. रोजच विजय मिळवावा लागतो तरच यशाच्या शिखराकडे वाटचाल करता येते. हा दृढनिश्‍चयच या युवकांनी घेतला.
चहा हे भारतीयांचे राष्ट्रीय पेय झाले आहे. त्यामुळे चहा पिणाऱ्यांची संख्या भारतात कमी नाही. हे हेरून आणि नव्या मागणीनुसार बदल करून चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय या तिघांनी घेतला. तिघेही मूळचे नागपूरचेच. शिक्षणाच्या निमित्ताने भेट झाली. भेटीतून मैत्री आणि आता व्यवसायात भागीदार आहेत. हेमंत हा कॉम्प्युटर इंजिनअर, अरमान एमबीए आणि अविनाश हा एमसीए करीत आहेत. अभियंता असलेला हेमंत शिवहारे हा त्रिमूर्तीनगरातील डंभारे ले-आउटमधील रहिवासी. घरची परिस्थिती व्यवसायाचीच. वडिलांचे एस. एस. फॅब्रिकेशन या नावाने प्रतिष्ठान आहे. घरीच पिठाची चक्कीसुद्धा आहे. आई गृहिणी असली तरी वडिलांच्या खांद्याला खादा लावून पिठाची चक्की चालविण्यासाठी कायम मदत करीत असते. हेमंतने वायसीसी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंता पदवी घेतली. पुणे येथे नोकरी लागली. पगार अल्प असल्याने नोकरी नाकारली. नागपुरातील आयटी पार्कमध्ये नोकरीचा शोध घेतला. फ्रेशर असल्याने अनेकांनी नकार दिला. कंपन्यांचा नकार पचवीत हार न मानता स्वतःचा व्यवसाय करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मित्र आणि भावाने होकार देताच सुरू झाली शोधयात्रा. टी स्टॉल लावण्याचे निश्‍चित झाले. संशोधन करून नव्या रूपात नव्या ढगांत चहा सादर करण्याच्या विचारातूनच "टीव्हॅल्यूशन' हे नाव पुढे आले. परिवाराच्या मदतीने चारचाकी वाहनांवर आकर्षक असा स्टॉल उभा केला. 1 सप्टेंबर 2018 मध्ये नव्या व्यवसायाचा उदय झाला.
टीव्हॅल्यूशनची वैशिष्ट्य
65 प्रकारचे चहा
देश-विदेशातून येणाऱ्या ग्राहकांची पसंती
10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत किंमत
संशोधन करून नव्या स्वरूपात चहा देण्याचा प्रयत्न
120 प्रकारच्या चवीचे चहा उपलब्ध करून देणार

loading image
go to top