पोलिसांनी सुरजागड पहाडाला का घातला गराडा...वाचा हे आहे कारण

मनोहर बोरकर
Monday, 29 June 2020

एटापल्ली तालुक्‍यातील बहुचर्चित सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खननाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. पोलिस प्रशासनाने या भागात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात केल्याची माहिती आहे.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्‍यातील बहुचर्चित सुरजागड पहाडीवरील लोहखनिज उत्खननाचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. सुरजागड पहाडावरील दुर्गम भागात नक्षल्यांच्या विरोधात शोधमोहीम राबविली जात आहे. येथे नक्षलवाद्यांनी 83 वाहनांची जाळपोळ केल्याने सतर्कता बाळगली जात आहे.

सुरजागड पहाडावर 50 वर्षे पुरेल एवढे लोहखनिज उपलब्ध असल्याने लॉयड मेटल कंपनीने पुढाकार घेऊन येथे लोह प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र वनकायद्यामुळे प्रकल्पाला 100 एकर जमीन मिळाली नाही. त्यातच अहेरी उपविभागातच प्रकल्प सुरू करावा, असा येथील नागरिकांचा आग्रह होता. त्यामुळे कंपनीने चामोर्शी तालुक्‍यातील सोनसरी येथे 60 एकर जागा खरेदी केली. ग्रामसभांच्या विरोधानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुरजागड पहाडावर लोह खनिज उत्खननासाठी लॉयड मेटल कंपनीला परवानगी दिली होती. त्यानंतर वर्षभर येथे उत्खनन सुरू होते.

दोनशे ट्रक लोह खनिजाचे उत्पादन

दररोज दोनशे ट्रक लोह खनिज लॉयड मेटलच्या घुग्घुस येथील कारखान्यात जात होते. दरम्यानच्या काळात नक्षलवाद्यांनी संधी साधून सुरजागड पहाडावरील 83 वाहनांची जाळपोळ केली. यामुळे सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित केले जात होते. त्यानंतर गृह विभागाने या भागात अतिरिक्त पोलिस दल तसेच पोलिस चौकी उभारून लॉयड मेटलला सुरक्षेचे कवच पुरवले. यामुळे लोह प्रकल्पाचे काम जोमाने सुरू झाले. मात्र, 16 जानेवारी 2019 ला लॉयड मेटल कंपनीच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याची घटना घडल्यानंतर प्रक्षोभक जमावाने कंपनीच्या पंधरा वाहनांची जाळपोळ करून लॉयड मेटल कंपनीच्या लोहखनिज उत्खनन व वाहतूक कामाला विरोध केला.

असं घडलंच कसं : नक्षलवाद्यांना पावसाळ्यात कोण करतात मदत...वाचा

दुसऱ्या एजन्सीला उत्खनन व वाहतुकीचा ठेका

याशिवाय काही राजकीय पक्षाच्या वतीने आठवडाभर आंदोलन केले. त्यामुळे काम बंद करण्यात आले. त्यानंतर सुरजागड पहाडावर काम करणाऱ्या चारशेच्या वर मजुरांनी काम सुरू करण्यासाठी आंदोलन केले. परंतु सुरक्षेअभावी काम बंद होते. मात्र, दीड वर्षानंतर पुन्हा सुरजागड पहाडावर लोहखनिज उत्खननाच्या प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. लॉयड मेटल कंपनीने आता अन्य दुसऱ्या एजन्सीला उत्खनन व वाहतुकीचा ठेका दिल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excavation of iron ore on Surjagad hill will be supervised by the police