esakal | मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बोलाविले अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

crime story.jpg

कोलीने लग्नानंतर पाच वर्षे होऊनही बहिनीस मुलबाळ नसल्याचे सांगितले. त्यावरून मोहिते याने माहूर येथील पुजारी मूल होण्याचे औषध देत असल्याचे सांगत, सचिन जाधव यास फोन करण्यास सांगितले.

मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बोलाविले अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने बोलावून, 70 हजार रुपये व नऊ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मानोरा येथील लाल माती परिसरात ता. 16 जानेवारी 2020 ला घडली होती. याबाबत मानोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासावरून मुख्य सूत्रधार व त्याचे साथिदार आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करीत असल्याचे उघड झाल्याने मुख्य सूत्रधार सुखदेव पंडित चव्हाण व त्याच्या साथिदारांविरुद्ध मानोरा पोलिस ठाण्यात विविध कलमांसह, संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धरमराज लक्ष्मणप्रसाद कोली (वय 32, रा. चंदेरी ता. चंदेरी जि. अशोकनगर, ह.मु. बाजारगाव कोंडाली जि. नागपूर) हा त्याच्या मूळ गावी चंदेरी येथे लग्नाकरिता गेला होता. तेथे मामाच्या दुकानावर विनोद मोहिते (ता. धामनगाव वाठोडा जि. वर्धा) त्याला भेटला. यावेळी कोलीने लग्नानंतर पाच वर्षे होऊनही बहिनीस मुलबाळ नसल्याचे सांगितले. त्यावरून मोहिते याने माहूर येथील पुजारी मूल होण्याचे औषध देत असल्याचे सांगत, सचिन जाधव यास फोन करण्यास सांगितले. 

हेही वाचा - व्यवसायच अवैध तेथे मदत पोहचणार कशी?

ता. 15 जानेवारी 2020 ला सचिन जाधव (रा. कारंजा लाड) यास फोन केला असता, तीन महिने औषधाचे 70 हजार रुपये होत असल्याचे सांगून, औषध घेण्यासाठी माहूर येथे येण्याचे सांगितले. त्यावरून ता.16 जानेवारी 2020 ला कोली, त्याची पत्नी, बहिन व बहिनीचा पती हे माहूरला जाण्याकरिता निघाले असता, सचिन जाधव याने दिग्रस येथून मानोरा येथे लालमाती, कॉलेज रोडवर बोलविले. कोली याने 70 हजार रुपये दिले. तसेच औषधाची मागणी केली. त्यानंतर चारचाकी वाहनातून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुखदेव चव्हाण (रा.धानोरा भुसे) व इतर सदस्य अजय चव्हाण (रा. कारंजा लाड), विनोद मोहिते (ता.धामनगाव वाठोडा जि. वर्धा), गजानन चव्हाण (ता. कारंजा) यांनी कोलीच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. 

यास विरोध केला असता, जिवे मारण्याची धमकी दिली. अशा फिर्यादीवरून मानोरा पोलिसांत गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले होते. या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी निर्देश दिले. तसेच शेजारील जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांची माहिती प्राप्त करण्याचे आदेश दिले. या तपासात मुख्य सुत्रधार व त्याच्या साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे असल्यावरून, अमरावती परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक यांच्या मंजुरीने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी दिली.

शेजारील जिल्ह्यांतही गुन्हे
या तपासात मुख्य सूत्रधार सुखदेव चव्हाण हा गुन्ह्यातील साथीदारासह आर्थिक फायद्यासाठी, व वर्चस्वासाठी गुन्हे करीत असून, गत 10 वर्षांत अकोला, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीकरिता दिला होता. त्यांच्या मंजुरीने सदरील सुत्रधारासह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचा तपास कारंजा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील करीत आहेत.