विद्यार्थिनीला अश्‍लील फोटो पाठविणे पडले महाग; खावी लागली तुरुंगाची हवा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

पीडित युवती ही अहमदनगर जिल्ह्यात शिक्षणासाठी गेली होती. त्यादरम्यान तिची आणि आरोपी राहुलची ओळख झाली होती.

अमरावती : शिक्षणासाठी अहमदनगर जिल्ह्यात गेलेल्या एका युवतीसोबत ओळख झाल्यानंतर तिचे अश्‍लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी शनिवारी (ता. 20) अटक केली. राहुल राज गिऱ्हे (रा. खामकरवाडी, जि. बीड) असे अटक युवकाचे नाव आहे. अमरावती न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली. 

पीडित युवती ही अहमदनगर जिल्ह्यात शिक्षणासाठी गेली होती. त्यादरम्यान तिची आणि आरोपी राहुलची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे प्रेम बहरत जाऊन ते एकमेकांच्या नको तेवढे जवळ आले. धूर्त आणि संधीसाधू राहुलने तिच्यासोबत अश्‍लील फोटो काढले. त्यामुळे ती चिडली. तिने राहुलला प्रतिसाद देण्याचे टाळले. त्यामुळे राहुलने तिचे अश्‍लील फोटो व मॅसेज पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू केला. पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून 7 मे 2020 रोजी ग्रामीणच्या सायबर ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार नोंदवली. प्रकरणी पोलिसांनी राहुल गिऱ्हे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

अवश्य वाचा- `फादर्स डे`ला मुलाने वडिलांना दिली अनोखी भेट; असे पूर्ण केले स्वप्न

सायबर पोलिसांनी आरोपी राहुलला न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने राहुल याला 3 जुलै 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावली, असे सायबर पोलिसांनी सांगितले. ही कारवाई उपनिरीक्षक वीरेंद्र चौबे, सहायक पोलिस उपनिरीक्षक वसंत कुरई, प्रमोद खुजे, संतोष कवीटकर, महिला पोलिस शिपाई वंदना खंडारे, सागर धापड, विकास अंजिकर यांच्या पथकाने केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expensive to send pornographic photos to a girl student; Police arrested him