प्रयोगशील शेती करून त्यांनी मिळवला लाभच लाभ! वाचा त्यांची यशोगाथा

रूपेश खैरी
Wednesday, 9 September 2020

शेतीचा वाढता खर्च कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी २०१६ पासून २ एकर जमीन नैसर्गिक शेती पद्धतीने कसली.

वर्धा : वाढत्या खर्चामुळे पारंपरिक शेती करणे सध्या परवडणारे नाही. पारंपरिक शेतीला बगल देत आजनसरा येथील शेतकऱ्याने वेगळी वाट चोखाळली.पारंपरिक पिकाबरोबरच नवे आंतरपिक घेत त्यांनी नफा कमविला आणि समाजासमोर आदर्श स्थापन केला. शेतात पिकविलेल्या आल्याची विक्री झाल्यानंतर शिल्लक आल्याच्या तुकड्यावर प्रक्रिया करून लाखोंचा नफा कमविला. राजू शेषराव साटोणे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

भोजाची महाराज यांच्या समाधी स्थळामुळे अख्या विदर्भात आजनसरा या गावाची ओळख आहे. याच गावात राजू साटोणे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे १६ एकर ओलिताची जमीन आहे. ते कपाशी लागवड करीत होते.. यातून त्यांना मिळणारे उत्पादन अत्यल्पच. शेतीचा वाढता खर्च कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी २०१६ पासून २ एकर जमीन नैसर्गिक शेती पद्धतीने कसली. या दोन एकरात त्यांनी अद्रक (आलं), लसूण, कांदा, गहू, उडीद, मुग आणि तुरीचे पीक घेतले. तुरीच्या दोन ओळींमधे त्यांनी आल्याचे आंतरपीक घेतले. तुरीची सावली मिळाल्याने आल्याच्या पिकाची वाढ जोमाने झाली. या वर्षात त्यांना दोन एकराचा लागवड खर्च ५५ हजार रुपये आला. तर त्यांना १ लाख ५० हजाराचे उत्पादन झाले.

यवतमाळ दौऱ्यानंतर हळदीची लागवड
यवतमाळ जिल्ह्यातील रानवड गावातील एका शेतकऱ्याच्या शेताला भेट दिल्यावर हळदीचे पीक त्यांच्या शेतात होऊ शकते याचा अंदाज राजू यांना आला. त्यांनी या शेतकऱ्याला आल्याचे बेणे देऊन हळदीचे बेणे खरेदी केले. २०१७ -१८ मध्ये वरील पिकांसोबत हळदीचे पिकही घेतले. गत वर्षीचे बियाणे ठेवल्याने त्यांचा बियाण्याचाही खर्च वाचला. त्यांना दोन एकरावरचा एकूण लागवड खर्च ४५ हजार तर एकूण उत्पन्न १ लाख ९४ हजार ७०० रुपये खर्च झाला.

सविस्तर वाचा - डासांचा त्रास होतोय? करा हे घरगुती उपाय

गावात आलेपावडरची विक्री
उत्पन्न वाढविण्याठी राजू यांनी आल्याच्या तुकड्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर तयार केली. या आले पावडरला कमलनयन जमनालाल बजाज फाउंडेशन तर्फे आयोजित धान्य मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारे प्रक्रिया करून ४० किलो आले पावडर १८० प्रती किलोच्या दराने विकली. यात त्यांना तिप्पट नफा झाला. या अनुभवातून त्यांनी गावात प्रसिद्ध असलेल्या भोजाजी महाराज मंदिरात भरणाऱ्या यात्रेत भाजीपाला विक्री सुरू केली. येथेही त्यांना लाभ झाला.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experimental farming by farmer in Wardha