क्या बात है! विदर्भाची हिरवी कंच मिरची निघाली परदेशवारीला; बाजार पुन्हा फुलले  

प्रदीप बहुरुपी
Saturday, 5 September 2020

संत्रा उत्पादक बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात हळूहळू शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळते झाले. कालांतराने हिरवी मिरचीचे मुबलक उत्पादन होत असल्याने मिरची विक्री व खरेदीच्या सोयीसाठी राजुराबाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिरवी मिरची मार्केट सुरू केले.

वरुड (जि. अमरावती) :  देशभरातील नागरिकांना हिरव्या मिरचीचा तडक्‍याचा आस्वाद देणारे तालुक्‍यातील राजुराबाजार येथील हिरवी मिरची मार्केट आता फुलायला सुरुवात झाली आहे. येथील मिरचीला देशासह परदेशात मागणी वाढली आहे. उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. हजारो हातांना काम देणारे हे मार्केट सुरू झाल्याने काही प्रमाणात बेरोजगारीची समस्याही निकाली निघाली आहे

संत्रा उत्पादक बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात हळूहळू शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळते झाले. कालांतराने हिरवी मिरचीचे मुबलक उत्पादन होत असल्याने मिरची विक्री व खरेदीच्या सोयीसाठी राजुराबाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिरवी मिरची मार्केट सुरू केले. दिवसेंदिवस हिरव्या मिरचीचे उत्पादन वाढू लागल्याने परप्रांतातील व्यापारीही येथे खरेदीसाठी येऊ लागले व पाहता पाहता हे मिरची मार्केट देशासह परदेशातही हिरवी मिरची निर्यात करणारी एक प्रसिद्ध बाजारपेठ ठरली.

अवश्य वाचा - हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका..

दरवर्षी पोळ्याच्या सणानंतर सुरू होणारे हे मार्केट आता फुलू लागले असून आतापर्यंत नऊ व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत या मिरची मार्केटमध्ये आतापर्यंत 178 टन हिरव्या मिरचीची आवक झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे.

बाजार तेजीत, पण पेरा घटला

गेल्या काही वर्षांत मिरचीवर येणारे विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बळावल्याने शेतकऱ्यांनी मिरचीवर केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मिरचीचे उत्पादनच होत नसल्याने हा बाजार कोमेजला होता. तसेच यावर्षी कोरोनामुळे या बाजारावर विपरीत परिणाम होईल, अशी धारणा काही शेतकाऱ्यांची झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मिरचीचा पेरा घटविल्याचे दिसून येते. मागील वर्षी 37,279.21 क्विंटल मिरचीची आवक येथे झाली होती, तर 478 हेक्‍टरवर शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली होती. यावर्षी ही लागवड 163 हेक्‍टरवर असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या नियोजनातून दिसून येतो.

बेरोजगारांच्या हाताला मिळाले काम

या मिरची बाजाराच्या उलाढालीवर अनेकांच्या संसारास हातभार लागतो. हॉटेल, हमाल, मजूर, वाहतूक करणारे वाहनचालक, किरकोळ दुकानदार, व्यापारी, रोजंदारीवरील बाजार समितीचे कर्मचारी या सर्वांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे बेरोजगारीची समस्याही निकाली निघाली आहे.

वाचा - नागरिकांनो सावधान! हा जीव तुमच्या घरी तर नाही ना? असेल तर आताच काढा बाहेर.. अन्यथा..

रात्रकालीन बाजार, देशभरात निर्यात

दिल्ली, कानपूर, गोरखपूर, कानपूर, कोलकाता, मुंबई, अशा देशातील मोठ्या बाजारपेठेत येथील मिरची पाठविली जाते. या बाजारात नागपूर जिल्ह्यातील काटोल, वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा घाडगे, तसेच जिल्ह्यातील मोर्शी, चांदूरबाजारपासून शेतकरी मिरची विक्रीसाठी आणतात. हा बाजार रात्रकालीन आहे. दिवसभर शेतीतील मिरची तोडल्यानंतर सायंकाळी शेतकरी मिरची विक्रीसाठी आणतात, अन्‌ हा बाजार रात्रभर चालतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधीपत्याखाली येणारे हे मार्केट पारदर्शी व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे. मिरची मोजल्यानंतर लगेच नगदी चुकारा शेतकऱ्यांना देण्यात येतो, हे येथील वैशिष्ट्य आहे. सध्या कलकत्ता, दिल्ली येथे ही मिरची जात असून तेथून बांगलादेशपर्यंत निर्यात केली जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: exporting of Green chilly started in amravati district