सीईओंच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र व्हायरल करणारा "तो' कोण? दिले चौकशीचे आदेश... 

mobile phone
mobile phone

यवतमाळ : "शिक्षकांनी शाळेत हजर रहावे' व "जिल्हा परिषदेत झाल्या नियुक्‍त्या' या विषयांसंबंधीचे जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते दोन्ही पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्घ कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे केली आहे. 

उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर 26 जूनला नेहमीप्रमाणे शाळा सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिला. पुढील आदेशापर्यंत शाळा "लॉक' राहणार आहेत. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी असलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक लॉकडाउन असल्याने बाहेर जिल्ह्यात आपल्या गावी राहत असून मुख्यालयाला दांडी मारत आहेत. शिक्षकांनी उपस्थिती कालावधीचे प्रमाणपत्र हजेरीच्या फोटोसह सादर करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते.

या पत्रामुळे शिक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. हे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या हाती लागताच त्याची खातरजमा करण्यात आली. शिक्षण विभागाकडून पत्र देण्यात आले नाही, हेदेखील स्पष्ट करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद पदभरतीच्या संदर्भातही पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या खोडसाळपणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी घेतली. असे कोणतेही पत्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले नाही. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी, बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. 

शिक्षक हजेरी व नियुक्तीसंदर्भात कोणतेही पत्र माझ्याकडून देण्यात आलेले नाही. कर्मचाऱ्यांमार्फत या पत्राची प्रत माझ्याकडे पोहोचली. हे पत्र कुणी व्हायरल केले, याबाबत सांगता येणार नाही. त्या व्यक्तीचा शोध घेण्याबाबतची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. 
- जलज शर्मा 
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com