ताई थांब जाऊ नको... स्वराजची शेवटची आर्त हाक 

संतोष तापकिरे 
शुक्रवार, 10 जुलै 2020

पंधरा दिवसांपूर्वी निकिता हरविल्याची नोंद वडिलांनी खोलापुरीगेट ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी तिला चवरेनगर येथील एका युवकाच्या घरून ताब्यात घेतले व पालकांच्या स्वाधीन केले. तिने पुन्हा घर सोडू नये म्हणून आई-वडिलांनी तिची समजूत काढली.

अमरावती : आपल्यावर आई-वडील प्रेम करीत नाही, असा समज करून घर सोडायचे हा एकच विचार तिच्या डोक्‍यात होता. ताई थांब नं, घर सोडून जाऊ नकोस, अशी आर्त हाक चिमुकल्या स्वराजने मोठ्या बहिणीला दिली. तो तिला जाऊन बिलगला. पण तिने लहान भावावर दया न दाखविता, त्याचा खून करूनच घर सोडल्यची खळबळजनक माहिती पोलिस तपासात पुढे आली. 

स्वराज गजानन तुपटकर (वय 10) याच्या खूनप्रकरणी खोलापुरीगेट पोलिसांनी निकिता (वय 21) हिला शुक्रवारी (ता. 10) सराफा परिसरातून अटक केली. पंधरा दिवसांपूर्वी निकिता हरविल्याची नोंद वडिलांनी खोलापुरीगेट ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी तिला चवरेनगर येथील एका युवकाच्या घरून ताब्यात घेतले व पालकांच्या स्वाधीन केले. तिने पुन्हा घर सोडू नये म्हणून आई-वडिलांनी तिची समजूत काढली. परंतु आई-वडील आपली समजूत काढत नसून, रागावतात, त्रास देतात, आपल्यावर प्रेम करीत नाही. असा समज तिने करून घेतला. 

Video : प्रसूतीनंतर ती वारंवार म्हणत होती 'मी मरेन, मी मरेन', तरीही कुणी लक्ष दिले नाही...
 

अमरावती शहरातील अकोली मार्गावरील दत्तविहार कॉलनीत व्यास ले-आउट परिसरात गजानन तुपटकर आपल्या कुटुंबासह राहतात. ते एका खाजगी शाळेत लिपिक आहेत. त्यांना पत्नी आणि मुलगी निकिता (वय 21) आणि मुलगा स्वराज (वय 10) अशी दोन अपत्ये. कोरोनामुळे गजानन तुपटकर यांची दोन्ही मुलं निकिता आणि स्वराज घरीच असायचे. गुरुवारी दुपारी आई-वडील दोघेही घरी नव्हते. घरी निकिता आणि स्वराज दोघेच होते.

संतापाच्या भरात मोठी बहीण निकिताने लहान भाऊ स्वराजच्या डोक्‍यात बत्ता हाणला. बत्त्याचा जोरदार प्रहार बसताच त्याच्या डोक्‍यातून रक्‍त वहायला लागले. बहिणीचे कपडेही रक्‍ताने माखले. रक्‍ताने माखलेले कपडे बदलून निकिताने घरून पळ काढला. अकोली मार्गावरील दत्तविहार कॉलनीतील व्यास ले-आउट परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहर हादरले असून, सर्वत्र या खुनाचीच चर्चा आहे. 

त्या घटनेनंतर निकिता घरी असताना, आई किंवा वडिलांपैकी एक जण घरी थांबायचे. त्यामुळे तिला घराबाहेर पडता येत नव्हते. गुरुवारी (ता. नऊ) दुपारी आई घराबाहेर पडली. आई, वडील कुणी नसताना मोठी बहीण बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे त्याने पाहिले. ताई घराबाहेर पडू नकोस असे म्हणून त्याने विनवणी केली. पण लहान भावाची आर्त हाक तिच्या कानावर पडली नाही.

चिमुकल्या स्वराजने खोलीचे दार आतून बंद केले. अन्‌ तो निकिताला बिलगला. लहान भावाचे बिलगणे तिला कळलेच नाही. जणू भाऊच अडथळा बनत असल्याचे बघून लोखंडी बत्त्याने त्याचे डोके ठेचून खून करूनच तिने घर सोडले, असे तिने बयाणात म्हटल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

रात्रभर थांबली फ्लॅटवर 

भावाचा खून केल्यानंतर निकिता घराबाहेर पडली. अकोली रेल्वेस्थानकाजवळ थांबली असताना रोशन नामक विवाहित युवकास थांबवून, आईसोबत भांडण झाल्याने घर सोडल्याचे ती म्हणाली. त्या युवकाने दया दाखवून रात्रभर तिला क्रांती कॉलनी येथील फ्लॅटवर आश्रय दिला. सकाळी प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त झळकताच रोशनने निकिताला दुचाकीने सराफा परिसरापर्यंत आणून सोडले, अशी कबुली तिने अटकेनंतर दिल्याचे पोलिस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी स्पष्ट केले. 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister arrested for murdering younger brother