esakal | होऽऽ... होऽऽ... तुम्हाला पाहिजे तो ब्रॅण्ड तासाभरात मिळून जाईल, मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

Fake liquor sold in Bhandara district due to lockdown

विदेशी मद्य महागल्याने मद्यप्रेमींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविल्याचे चित्र आहे. टाळेबंदीच्या काळातही प्रत्येकाला हवा तो ब्रॅंड पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने मद्यप्रेमी दारूची दुकाने सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. 

होऽऽ... होऽऽ... तुम्हाला पाहिजे तो ब्रॅण्ड तासाभरात मिळून जाईल, मात्र...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीने बारसह दारू दुकानांना तब्बल दीड महिन्यापासून कुलूप लागले आहे. "एकच प्याला'साठी तळमळणाऱ्या तळीरामांची दारूने अक्षरशः: दारुण अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ऑरेंज झोनमधील मद्यविक्रीला सरकारने हिरवा सिग्नल दिला. तथापि, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करीत स्थानिक परवानगी नाकारली. ही संधी साधून सध्या सोशल मीडियावर घरपोच दारूविक्रीची जाहिरात होत असून ही दारू बनावट असल्याची शक्‍यता आहे. 

कोरोनामुळे टाळेबंदी व संचारबंदी लागू झाली. बार व मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सरकारने दिले. तत्पूर्वी, दारू दुकानातील जमेल तितका साठा विक्रेत्यांनी बाहेर काढून ठेवला. लॉकडाउन सुरू झाल्यापासून मागणीनुसार मद्यप्रेमीचा घसा ओला करण्यासाठी ठराविक माणसांच्या माध्यमातून छुप्या मार्गाने दारूविक्री सुरू होती. मूळ किमतीपेक्षा तिप्पट व चौपट किमतीत दारूविक्री करण्यात आली. लॉकडाउन वाढेलच अशी खात्री होती. पण तिसरा टप्प्यापर्यंत दारू दुकाने सुरू होतील अशी आशा अनेकांना होती. टाळेबंदी वाढल्याने विक्रेत्यांकडे असलेला साठा जवळजवळ संपण्याच्या बेतात आहे.

हेही वाचा - संपूर्ण हॉटेल होते रिकामे, पण दोन खोल्यांमध्ये सुरू होता हा प्रकार

काही बारमालकांनी दुकानातील माल काढून चोरीचा बनाव सुद्धा केला होता. उरलासुरला माल वाट्टेल त्या किमतीत विकला जात आहे. महागड्या किमतीत दारू खरेदी करणारे अनेक महाभाग आहेत. परंतु, प्रत्येकाला महागडी दारू खरेदी करून शौक भागविणे परवडणारे नाही. त्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा मोहफुलाच्या दारूकडे वळविला आहे. ग्रामीण भागातील रोजगारसुद्धा बंद असल्याने अनेक जण मोहफुलापासून हातभट्टीवर दारू गाळत आहेत. ही दारू शहरात खुष्किच्या मार्गाने पुरविली जाते. 

पोलिसांकडून छापा मारण्याची कारवाई सुरू आहे. परंतु, कारवाई होताच काही दिवसांत पुन्हा दारूविक्री पूर्ववत सुरू होते. विदेशी मद्य महागल्याने मद्यप्रेमींनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळविल्याचे चित्र आहे. टाळेबंदीच्या काळातही प्रत्येकाला हवा तो ब्रॅंड पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने मद्यप्रेमी दारूची दुकाने सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. 

बनावट मद्यनिर्मिती करणारे सक्रिय

राज्य सरकारने ग्रीन, ऑरेंज व रेडझोनमध्ये दारूची दुकाने उघडण्याचे आदेश दिले होते. भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने येथे मद्याची दुकाने सुरू होतील, अशी अपेक्षा मद्यप्रेमींना लागून होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू होणार नाहीत, असे स्पष्ट केल्याने त्यांची चांगलीच निराशा झाली आहे. लॉकडाउनमुळे दारूचा दुष्काळ पडल्याने बनावट मद्यनिर्मिती करणारे सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडून शक्कल लढवून मद्यप्रेमींना आकर्षित केले जात आहेत. फक्त दुपटीने दारू विक्री केली जात आहे.

क्लिक करा - प्रसूतीपूर्वी केलेल्या चाचणीत अहवाल आला निगेटिव्ह... चिमुकला जन्मतःच रडला अन्‌ डॉक्‍टर म्हणा

ओरिजनल बॉटल, डुप्लिकेट दारू

दारू दुकाने बंद असल्याची संधी साधून बनावट मद्यनिर्मिती करणारे सक्रिय झाल्याचे दिसून येते. सध्या फेसबुकसह सोशल मीडियावर दारू घरपोच उपलब्ध करून देण्याबाबत चक्क जाहिरात केली जात आहे. त्यावर दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, तुम्हाला पाहिजे तो ब्रॅण्ड तासाभरात मिळून जाईल असे सांगितले जाते. परंतु, गेली अनेक दिवस दारू दुकाने बंद आहेत. ब्लॅकमध्ये मागणी अधिक असल्याने विक्रेत्यांनी बाहेर काढलेला साठासुद्धा संपल्यात जमा आहे. अशावेळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आमिष दाखवून विकली जाणारी दारू ही नकली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याकडे उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. 

loading image